मुसळधार पावसामुळे ईशान्य अफगाणीस्तानातील एका गावावर डोंगर कोसळून तब्बल २५०० लोक बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी घडली. संयुक्त राष्ट्राने या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३५० इतका सांगितला असला तरी या दुर्घटनेत निम्मे गावच डोंगराखाली गाडले गेल्याने मृतांचा आकडा हजारात असण्याची भीती आहे.
हिंदुकुश पर्वतराजीतील बदख्शा प्रांतातील होबो बारिक या गावावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास डोंगर कोसळला. या प्रांतातील अर्गो या जिल्ह्य़ाला गेल्या काही दिवसांपासून अतिपावसाने झोडपले आहे. पहाडी व दुर्गम भागातील या जिल्ह्य़ातील अनेक गावांतील लोकांना त्यामुळे सुरक्षित स्थळी हलवण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. होबो बारिक गावातील लोकांना स्थलांतरित केले जात असतानाच शुक्रवारी जमीन खचून मोठमोठय़ा दरडींखाली ३०० घरे गाडली गेली. त्यात अडीच हजार लोक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्गम भाग असल्याने घटनास्थळापर्यंत मदत पोहोचवण्यात अनंत अडचणी येत असल्याची माहिती बदख्शाचे प्रांताधिकारी शाह वलिवल्ला अदिब यांनी दिली. या भागातील आणखी ७०० घरे रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले असून तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अफगाणीस्ताच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या घटना नेहमीच होत असतात. फेब्रुवारी २०१०मध्ये ३८०० मीटर उंचीवरील सलांग पास येथे दरड कोसळून १७०हून अधिक लोक ठार झाले होते.