उत्तर प्रदेशचे मुख्य माहिती आयुक्त हाफिज उस्मान हे त्यांच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आले आहेत. मुस्लीम हे हिंदूंचे छोटे भाऊ असून कुटुंबाचा संसार व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी हिंदूंचा सन्मान राखला पाहिजे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर हिंदूंनीही अशा पद्धतीनेच राहिले पाहिजे, असा सल्लाही दिला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याप्रकरणी वृत्त दिले आहे. ते म्हणाले, मी प्रत्येक मुसलमानाला आवाहन करतो की, त्यांनी हिंदूंचा सन्मान केला पाहिजे. कारण भारतात हिंदू मोठा भाऊ तर मुसलमान छोटा भाऊ आहे. जर सन्मान राखला गेला नाही तर कुटुंब व्यवस्थित चालू शकत नाही. हिंदूंना सल्ला देताना त्यांनी म्हटले की, मोठेही तेव्हाच मोठे असतात, जोपर्यंत ते आपल्यापेक्षा छोट्यांचा सन्मान करतात. मुझफ्फरनगर येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

यापूर्वीही उस्मान चर्चेत आले होते. गतवर्षी मुरादाबाद येथे माहिती अधिकारांतर्गत आयोजित कार्यशाळेत त्यांनी अनेकवेळा ‘जय श्रीराम’ची घोषणा दिली होती. भारतात इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत अल्पसंख्याकांना जास्तीचे अधिकार मिळाल्याचेही ते म्हणाले होते. भारत असा देश आहे की, तिथे आम्ही शांततेने राहू शकतो. मी अनेक देशांचा दौरा केला आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात..मी तेथील स्थानिक नागरिकांशी तेथील राजा किंवा पंतप्रधानांविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही आपल्या सरकारविरोधात बोलताना दिसला नाही. भारतात तुम्ही आपल्या अधिकारांविषयी बोलू शकता आणि आंदोलनही करू शकता, असेही ते म्हणाले होते.