आपल्या मुलाच्या पायात खिळे ठोकल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलाने मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी हे कृत्य केल्याचा या महिलेचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेली शहरातली ही घटना आहे.

या महिलेने सांगितलं की, तीन पोलिस आले आणि आपल्या मुलाला कुठेतरी घेऊन गेले. अनेक तास शोधल्यानंतर हा मुलगा जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकले होते. बरेलीमधल्या बरादरी भागातली ही घटना आहे. या महिलेने आणि तिच्या परिवाराने सांगितलं की, त्यांनी याविषयी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी या मुलाला अटक करण्याची धमकी दिली.

बुधवारी या महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या विषयात लक्ष घालण्याची आणि तिला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. या प्रकरणावर भाष्य करताना पोलीस अधिकारी रोहित साजवान म्हणाले, हा मुलगा जुना आरोपी आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या सगळ्यातून सुटण्यासाठी तो मुलगा हे सोंग करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचे हे आरोप चुकीचे असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट कऱण्यात आलं आहे.