केंद्र सरकारचे केवळ सीबीआयवर आणि प्राप्तिकर खात्यावर नियंत्रण असून, त्या माध्यमातून आपल्या समर्थकांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुंबईत केला. 
पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी मुंबईत आले आहेत. सांताक्रुझ विमानतळावर त्यांचे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर डायमंड असोसिएशनच्या कार्यक्रमात मोदी यांनी त्यांच्या शैलीत केंद्रातील कॉंग्रेस नेतृत्त्वाखालील सरकारवर हल्ला चढविला.
ते म्हणाले, सध्या देशाला अनेक ग्रहणे लागली आहेत. अनेक ग्रहांची छाया देशाचे वाटोळे करीत आहे. मात्र, हा काळ जास्तीत जास्त आठ महिन्यांचा आहे. नऊ महिन्यांनंतर देश सर्व संकटांचा सामना करून नव्या शक्तीने पुढे जाईल. हिऱयासारखेच आपल्या देशाला चमकविण्यासाठी तुम्हाला निर्णय घेण्याची वेळ आलीये. तुम्ही जर योग्य निर्णय घेतला, तर देशाला चमकविण्यापासून कोणी रोखू शकत नाही.
सध्या देशात अविश्वासाचे वातावरण असून, कोणाचा कोणावर विश्वास नाही. या स्थितीत काही नेते अजून ८०-९०च्या दशकांत जगताहेत. ते अजून त्याच काळातील भाषा बोलतात, असे सांगून मोदी म्हणाले, देशातील तरुणपिढीला केवळ एकच भाषा समजते. ती म्हणजे केवळ विकास. देशाचा विकास करणारी आर्थिक निती हवी आहे. पण, अशी व्हिजन सध्याच्या सरकारमध्ये दिसत नाही. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून प्रगतीचे, विकासाचे चित्र दिसत नाही.