अनिल अंबानींवर क्रोनी कॅपिटलिस्ट असल्याचा राहुल गांधींकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांना अखेर अनिल अंबानींनी आपल्या रिलायन्स ग्रुपच्यामार्फत रविवारी उत्तर दिले. रिलायन्स ग्रुपने एक पत्रक काढून म्हटले की, युपीएच्या कार्यकाळात अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपला १ लाख कोटी रुपयांची कंत्राट देण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस सरकार बेईमान उद्योगपतीच्या सोबत होती का? असा सवालही विचारण्यात आला आहे.

रिलायन्स ग्रुपने म्हटले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या दाव्यांना कुठलाही आधार नाही. त्याचबरोबर त्यांनी अनिल अंबानींबाबत आरोपांचे कुठलेही पुरावे सादर केलेले नाहीत. राहुल गांधींनी नुकतेच माध्यमांशी बोलताना अनिल अंबानींचा उल्लेख क्रोनी कॅपिटॅलिस्ट आणि बेईमान व्यावसायिक असा केला होता. मात्र, हा आरोप खोटा असल्याचे सांगताना राहुल गांधी खोटा आणि बदनामी करणारे अभियान चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

युपीए सरकारने २००४-२०१४ या काळात अनिल अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स ग्रुपला पॉवर, टेलिकॉम, रस्ते, मेट्रो अशा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात १ लाख कोटी रुपयांची कंत्राट दिली होती. त्यामुळे राहुल गांधींनी हे सांगावं की त्यांच्या सरकारने १० वर्षांच्या काळात एका कथीत क्रोनी कॅपिटॅलिस्ट आणि बेईमान व्यावसायिकाला समर्थन देत होते का? असा सवालही रिलायन्स ग्रुपने केला आहे.