अयोध्येत राममंदिराच्या उभारणासाठी पाठिंबा मिळावा या हेतूने विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत २५ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या दरम्यान ‘८४ कोसी परिक्रमे’चे आयोजन केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्यावर बंदी घातल्याने संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. भाजपने उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. तर संयुक्त जनता दलाने विश्व हिंदू परिषदेवर टीकास्त्र सोडल्याने निवडणुकीच्या पूर्वी हा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. मतांचे धृवीकरण करून निवडणुका जिंकण्याची भाजपची ही चाल असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
सरकारने बंदी आणली तरी विश्व हिंदू परिषद आपला कार्यक्रम निर्धारित कार्यक्रमानुसार पार पाडेल असे विहिंपचे नेते स्वामी चिन्मयानंद यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आझम खान यांच्या इशाऱ्यावर सरकार चालत असल्याचा आरोप चिन्मयानंद यांनी केला. त्यांच्या दबावामुळेच सरकारने परिक्रमेवर बंदी घातल्याचा आरोप त्यांनी केला. देशभरातून विहिंप कार्यकर्ते आणि साधू मोठय़ा संख्येने अयोध्येत दाखल होतील असा निर्धार चिन्मयानंद यांनी व्यक्त केला. बंदीने आमच्यावर फरक पडणार नाही, सरकारशी दोन हात करण्यास आम्ही तयार असल्याचा इशाराही दिला.
या यात्रेसंदर्भात काही दिवसांपूर्वी विहिंप नेत्यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर आझम खान संतापले होते. मुख्यमंत्र्यांच्या अशा कृतीने मुस्लीम समाजात चुकीचा संदेश जाईल, असे वक्तव्य केले होते. त्या पाठोपाठ सरकारने बंदी घातली. अयोध्येला लागून असलेल्या सहा जिल्ह्य़ांच्या सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली. शीघ्र कृती दलासह जादा फौजफाटा या जिल्ह्य़ांच्या सीमेवर तैनात करण्यात येईल असे पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) आर. के. विश्वकर्मा यांनी सांगितले. यात्रेच्या आयोजकांनी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गृह खात्याचे विशेष सचिव अरुणकुमार मिश्रा यांनी केला.

बंदीवरून आरोप-प्रत्यारोप
भाजपने बंदी घालण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. सरकारचे हे मतपेढीचे राजकारण असल्याचा आरोप भाजप नेते कलराज मिश्रा यांनी केली आहे. एकेकाळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने विहिंपचे अध्यक्ष अशोक सिंघल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यात्रा रोखल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा सिंघल यांनी दिला होता. त्यावर सरकारला अशी धमकी देणारे सिंघल हे हिंदूंचे ठेकेदार आहेत काय, असा सवाल पक्षाध्यक्ष शरद यादव यांनी केला. मतांचे ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचे काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले. मोदींचे निकटवर्तीय अमित शाह यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी केल्यावरच भाजपची चाल लक्षात आली असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.