भारताला उत्कर्ष साधायचा असेल तर देशातील हिंदूंचा विकास होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मध्यप्रदेशातील गोरखपूर येथे संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी संघावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. देशातील हिंदुंनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांनी इतर लोक काय बोलतात, त्याकडे लक्ष देणे टाळले पाहिजे. संघांच्या शाखांमध्ये काय चालते हे त्यांना माहित नसते. या शाखांकडे केवळ बाहेरून पाहून ते स्वत:ची मते बनवतात आणि टीकाही करतात. यापैकी अनेकजण स्वत:च्या फायद्यासाठी हे सगळं करतात. त्यामुळे आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे भागवत यांनी सांगितले.
केवळ कायदा आणि प्रशासनात सुधारणा करून समाजात बदल घडणार नाही. त्यासाठी समाजापुढे एक आदर्श ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या डोळ्यांसमोर नेहमी उच्च ध्येय असले पाहिजे. या सगळ्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल तेव्हाच आपल्याला ध्येयापर्यंत पोहचणे शक्य होईल. याचबरोबर हिंदूंचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल. त्यामुळे देशहितासाठी हिंदूंचा विकास आणि एकजूट महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.