बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजदशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असल्याचा आरोप करून विरोधी भाजपने मंगळवारी राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घातला.
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव यांनी सभा तहकुबीची सूचना स्वीकारण्याची अध्यक्षांना विनंती केली. भाजपच्या पाच आमदारांनी कायदा, सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दिलेली तहकुबी स्वीकारून त्यावर प्रथम चर्चा करावी, अशी मागणी यादव यांनी केली. त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेऊन सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू केली. जद(यू)च्या ज्या आठ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली ते आठ सदस्यही भाजपच्या सदस्यांसमवेत होते.
अध्यक्ष चौधरी यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. तरीही सदस्य शांत होत नसल्याचे पाहून कामकाज तहकूब करण्यात आले. नितीशकुमार यांनी राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप नंदकिशोर यादव यांनी केला.