पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देणारी लष्कराची कारवाई सुरू असतानादेखील संसदेने विरोधक व सत्ताधाऱ्यांचा गोंधळ अनुभवला. ललित मोदी यांना मदत करणाऱ्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करणाऱ्या काँग्रेस खासदारांनी सरकारविरोधी गोंधळाचा कळस गाठला. गोंधळातही कामकाज सुरूच ठेवणाऱ्या लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या आसनासमोर येऊन निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले.
विरोधक व सत्ताधाऱ्यांच्या परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरातून तीन वेळा तहकूब करण्यात आले. प्रश्नोत्तराचा तास वीस तर शून्य प्रहर केवळ ४५ मिनिटे चालला. पावसाळी अधिवेशनात झालेले हे सर्वाधिक कामकाज आहे. चौधरी यांना निलंबित केल्यानंतर लगेचच काँग्रेस सदस्यांनी महाजन यांच्या आसनासमोर येत घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले.
गुरुदासपूरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याने लोकसभा सदस्य गांभीर्याने चर्चा करतील ही अपेक्षा फोल ठरली. कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या मिनिटभरात काँग्रेस ललित मोदी प्रकरण, समाजवादी पक्ष जातीनिहाय जनगणना, तर तेलंगणा राष्ट्र समितीचे सदस्य स्वतंत्र उच्च न्यायालयाच्या मागणीसाठी महाजन यांच्या आसनासमोर जमले.
काँग्रेसचे सदस्य सतत उच्चारवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देत होते. या परिस्थितीतदेखील प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. गुरुदासपूरमध्ये सुरू असलेल्या कारवाईची माहिती देण्याची मागणी पंजाबच्या सदस्यांनी केली. मात्र चकमक सुरू असल्याचे सांगून सरकारकडून निवेदन देण्यात आले नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या, मंगळवारी लोकसभेत निवेदन देतील. दरम्यान, संसदेत कोंडी कायम असल्याने सरकारने गोंधळातच कामकाज सुरू ठेवण्याची रणनीती आखली आहे.