वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
राज्यसभेचे कामकाज सोमवारी सकाळी सुरू झाल्यानंतर अखंड आंध्र प्रदेशचे समर्थन करणाऱया सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी केली आणि कागदी फलक झळकावले. या फलकांवर अखंड आंध्र प्रदेशाचे समर्थन करणारा मजकूर लिहिण्यात आला होता. या गोंधळामुळे सुरुवातीला सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेतही हीच परिस्थिती असल्यामुळे तिथे सुरुवातील एक तासासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर गोंधळ कायम राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
गेल्या बुधवारी संसदेचे कामकाज सुरू झाल्यापासून सातत्याने तहकूब करावे लागते आहे. वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून आंध्र प्रदेशमधील सदस्यांनी दोन्ही सभागृहात घोषणाबाजी आणि गोंधळ घालण्याचे प्रकार सुरूच ठेवल्यामुळे कामकाज तहकूब करावे लागते आहे. दरम्यान, २१ फेब्रुवारीला संसदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब होण्यापूर्वी वेगळ्या तेलंगणाचे विधेयक संसदेमध्ये मांडले जाईल, यावर केंद्र सरकार ठाम आहे.
तेलंगणाची कोंडी फोडण्यासाठीपंतप्रधानांचा पुढाकार
गदारोळामुळे संसदेचे कामकाज ठप्प झाल्याने निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेतला आहे. तेलंगणा तसेच इतर महत्त्वाच्या विधेयकांच्या संमतीसाठी पाठिंबा मिळावा म्हणून मनमोहन सिंग यांनी भाजप नेत्यांना १२ फेब्रुवारीला स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे. रविवारी पंतप्रधानांनी लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्याशी संपर्क साधल्याचे सूत्रांनी सांगितले. आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकात सुधारणा कराव्यात या भाजपच्या मागणीला सरकारने सहमती दर्शवली आहे. तेलंगणाला भाजपने सशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर राज्यसभेत तेलंगणा विधेयक एक ते दोन दिवसांत मांडले जाईल.