News Flash

सोनियांच्या उल्लेखाने राज्यसभेत गोंधळ

सभागृहात शून्य प्रहराला त्यांनी ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर लाच प्रकरण सभागृहात उपस्थित केले. हे

| April 28, 2016 01:04 am

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर लाच प्रकरणी
ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर लाच प्रकरणात भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख केल्याने राज्यसभेत बुधवारी प्रचंड गदारोळ माजला आणि सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झडली.
सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख होताच काँग्रेसच्या संतप्त सदस्यांनी सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांच्या दिशेने हेतुपूर्वक धाव घेतल्याने सभागृहात अनुचित प्रकार घडणार असे एका क्षणाला वाटले होते, मात्र कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मार्शलनी सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेतली आणि अनर्थ टळला.
त्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी डॉ. स्वामी यांचा उल्लेख सीआयएचे हस्तक असा केल्याने गोंधळात अधिकच भर पडली आणि भोजनाच्या सुटीपूर्वीच सभागृहाचे कामकाज अनेकदा तहकूब करण्याची वेळ आली. या वेळी राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी निदर्शने करणाऱ्या सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचे आदेश दिले.
डॉ. स्वामी यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची मंगळवारीच शपथ घेतली. सभागृहात शून्य प्रहराला त्यांनी ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर लाच प्रकरण सभागृहात उपस्थित केले. हेलिकॉप्टर खरेदीतील मध्यस्थ ख्रिस्तीयन मायकेल यांच्या आरोपाचा संदर्भ देत डॉ. स्वामी यांनी इटलीतील उच्च न्यायालयाला पाठविण्यात आलेल्या पत्राचा उल्लेख केला. त्या वेळी डॉ. स्वामी यांनी सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला.
त्यानंतर गोंधळाला सुरुवात होताच उपसभापती पी. जे. कुरियन यांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृहाच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर कुरियन यांनी डॉ. स्वामी यांनी दिलेला संदर्भ कामकाजातून काढून टाकला. आपले पहिलेच भाषण असल्याने केवळ ही बाब स्पष्ट करीत आहोत, असे कुरियन म्हणाले.
सोनियांकडून आरोपांचे खंडन
ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात आपण किंवा पक्षाच्या नेत्यांनी लाच घेतल्याच्या आरोपांचे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी जोरदार खंडन केले. हे आरोप निराधार असून हा चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न असल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या.
मायकेल यांचे पंतप्रधानांना पत्र
हेलिकॉप्टर खरेदी करारातील मध्यस्थ जेम्स ख्रिस्तियन मायकेल याने आपल्याला राजकीय कटाचा बळी करण्यात आल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी चौकशीला तयार असल्याचे पत्र मायकेल यांनी पंतप्रधानांना पाठविले असल्याचे त्यांनी ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2016 1:04 am

Web Title: uproar in rajya sabha after swamy names sonia gandhi in agustawestland scam
Next Stories
1 दुष्काळनिवारणात भेदभाव नको !
2 डोनाल्ड ट्रम्प पाच, तर क्लिंटन चार राज्यांत विजयी
3 लादेनला ठार मारण्याच्या अमेरिकी मोहिमेत पाकिस्तानला सौदी अरेबियाचा पाठिंबा
Just Now!
X