पुत्रप्राप्तीसाठी रामदेव बाबा यांच्या दिव्य फार्मसीकडून तयार करण्यात आलेल्या औषधाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गुरूवारी गदारोळ झाला. ‘दिव्य पुत्रजीवक बीज’ हे औषध वंध्यत्व दूर करणारे असल्याचा दावा करीत दिव्य फार्मसीकडून या औषधाची विक्री करण्यात येते. जनता दल युनायटेडचे खासदार के.सी.त्यागी यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. या औषधाचे उत्पादक दिव्य फार्मसी यांच्याकडून हे औषध घेतल्याने मुलगा जन्माला येत असल्याचा प्रचार केला जात असल्याचा आरोप त्यागी यांनी केला. त्यामुळे दिव्य फार्मसीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी स्वत: औषधांची पाकिटे सभागृहाला दाखवली. त्यागी यांना जया बच्चन आणि जावेद अख्तर यांनीही साथ दिली. या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी याप्रकरणाची त्वरीत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सरकार लिंग-गुणोत्तरासारख्या विषयांवर अत्यंत गंभीरपणे विचार करते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमावर लक्ष ठेवून असतात, असेही नड्डा यांनी सांगितले.