ऊठसूठ कोणत्याही विषयाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडण्यावरून खडसावल्यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
आम आदमी पक्षाच्या सभेदरम्यान एका शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी या घटनेवर अत्यंत संवेदनशील भूमिका घेतली. आपचे भगवंत मान यांनी चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ करण्याऐवजी शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे म्हटल्यानंतर लोकसभा अध्यक्षा महाजन यांनी ‘मनकी बात’ शब्द कामकाजातून वगळण्याची सूचना केली. त्यावर विरोधकांनी एकच गलका केला. काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे, दीपेंदर हुडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय यांनी महाजन यांच्याकडे आक्षेप नोंदविला. ‘मनकी बात’ हा शब्द असंसदीय ठरू शकत नाही, याकडे खरगे यांनी लक्ष वेधले.
संपूर्ण कामकाजातील वक्तव्य पुन्हा तपासून यावर अंतिम निर्णय होईल. तुम्ही आसनास (अध्यक्षांना) आव्हान देऊ शकत नाही, अशा शब्दांत महाजन यांनी विरोधी पक्षांना खडसावले.
दुपारी शेतकरी समस्यांवर दीपेंदर हुडा यांनी चर्चेस प्रारंभ केला. ते म्हणाले की, प्रत्येकाने आपापली भूमिका बाजूला ठेवून या घटनेकडे मानवतेच्या दृष्टीने पाहायला हवे होते
सचौगत रॉय यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. अनेक राज्यांमध्ये शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांच्याविषयी ट्विटरवरून प्रतिक्रिया देण्याऐवजी मोदी यांनी सभागृहात बोलावे, असा टोमणा रॉय यांनी मारला.

शेतकऱ्यांना ‘असहाय’ सोडणार नाही – मोदी
आम आदमी पक्षाच्या सभेत आत्महत्या केलेल्या गजेंद्र सिंह या शेतकऱ्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्विटरवरून भावनिक प्रतिक्रिया दिली होती. लोकसभेत बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या समस्येचे समाधान सामूहिक प्रयत्न करून शोधावे लागेल. शेतकऱ्यांच्या विकासासाठी दिल्या जाणाऱ्या चांगल्या सूचनांचा आम्ही निश्चित विचार करू. कुठे चुकले ते शोधावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना असहाय सोडणार नाही, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.