उत्तर प्रदेशचा कारभार हाती घेतल्यापासून कामाचा धडाका लावणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला असून त्यांनी राज्यातील नेते, माजी मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी खासदार डिंपल यादव, माजी मंत्री आझम खान, शिवपाल यादव आणि समाजवादी पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. त्याचबरोबर समाजवादी सरकारशी संबंधीत असलेल्या सुमारे १०० अन्य लोकांची सुरक्षा मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे

नुकताच झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत पूर्वीच्या सरकारमधील नेते आणि मंत्र्यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेसंबंधीचा अहवाल मागवण्यात आला होता. त्यानंतर डिंपल यादव, आझम खान, शिवपाल यादव आणि रामगोपाल यादव यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. दुसरीकडे सरकारने समाजवादी पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंह यादव, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मायावती यांची झेड सुरक्षा कायम ठेवली आहे. बदायूंचे खासदार धर्मेंद यादव यांची वाय प्लस ही सुरक्षा श्रेणीही कायम ठेवण्यात आली आहे. बसपाचे माजी मंत्री रामवीर उपाध्याय यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. नगरविकास मंत्री सुरेश खन्ना यांना वाय दर्जाची श्रेणी पुरवण्यात आली आहे.
त्याचबरोबर आशु मलिक, राकेश यादव, अतुल प्रधानसमवेत समाजवादी सरकारशी संबंधित लोकांची श्रेणीवार सुरक्षा काढण्यात आली आहे. व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी प्रमुख गृह सचिवांना आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींना मिळालेल्या श्रेणीवार सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल.