करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे लांबणीवर टाकण्यात आलेल्या २०२० सालच्या मुलकी सेवा परीक्षांच्या मुलाखती २ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने दरवर्षी नागरी सेवा परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि व्यक्तिमत्त्व चाचणी (मुलाखत) अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. यातून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) यांसह इतर सेवांसाठी अधिकारी निवडले जातात.

करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे यूपीएससीने या प्रतिष्ठित परीक्षेसाठीच्या मुलाखती या वर्षी एप्रिल महिन्यात पुढे ढकलल्या होत्या. ‘परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, नागरी सेवा परीक्षा २०२० च्या मुलाखती २ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे,’ असे यूपीएससीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

व्यक्तिमत्त्व चाचण्यांची ई-समन पत्रे लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असून ती आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. उमेदवारांना कळवण्यात आलेली मुलाखतीची तारीख आणि वेळ यांच्यात बदल करण्याची कुठलीही विनंती सामान्यत: विचारात घेतली जाणार नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.