सनदी सेवा परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादा व कमाल प्रयत्नांची संख्या कमी करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे लोकसभेत सांगण्यात आले.
कार्मिक मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले की, सध्यातरी सनदी सेवा परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादा व प्रयत्नांची कमाल मर्यादा वाढवण्याचा विचार नाही. केंद्र सरकार सनदी सेवा परीक्षेसाठी वयाची कमाल वयोमर्यादा व प्रयत्नांची संख्या कमी करण्याचा विचार करीत असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. लेखी उत्तरात सिंग यांनी म्हटले आहे की, विविध घटकांकडून आमच्याकडे याबाबत चिंता व्यक्त करणारी निवेदने आली आहेत. र्सवकष विचार करून केंद्र सरकारने असे ठरवले की,प्राथमिक परीक्षेच्या पेपर दोन मध्ये ‘इंग्रजी भाषा आकलन कौशल्य’ हा विभाग टाकण्यात यावा, पण सीएसइ २०१४ च्या गुणवत्ता यादीत त्याचे गुण ग्राह्य़ धरू नयेत. सीएसइ २०११ ला बसलेल्या विद्यार्थ्यांना सीएसइ २०१५ च्यावेळी अजून एका प्रयत्नाची संधी द्यावी असा निर्णयही घेण्यात आला आहे.

पोलिसांच्या मारहाणीत पॅलेस्टाईनचे मंत्री ठार
रामल्ला : पॅलेस्टाईनचे मंत्रीपदाचा दर्जा असलेले अधिकारी पश्चिम किनारा भागात निदर्शनांच्यावेळी इस्रायली पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मरण पावले. झियाद अबू एन असे त्यांचे नाव असून ते इस्रायली वसाहतींच्या पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे काम पाहत होते. पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी या क्रूर हल्ल्याचा निषेध केला असून ठोस प्रतिकार करण्याचा इशारा दिला आहे. त्यांना छातीत मारण्यात आले, असे रामल्ला रूग्णालयाचे अहमद बिटावी यांनी सांगितले. अबू एन यांना इस्रायली दलांनी रायफलीच्या दस्त्याने व हेल्मेटने मारहाण केली. रामल्लाजवळ तुर्मुस अय्या येथे ही घटना घडली.

बेनझीर यांचा मारेकरी चकमकीत ठार
कराची : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येच्या कटातील सूत्रधार फिरदोस खान हा दहशतवादी कराचीजवळ पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला.
२००७ मध्ये भुट्टो यांच्यावर ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात १४० जण ठार झाले होते. त्यामागे फिरदोसचा हात होता. तालिबानचा दहशतवादी असलेला फिरदोस आत्मघातकी हल्लेखोरांना प्रशिक्षण द्यायचा असे वरिष्ठ पोलीस अधिकारी उस्मान बाजवा यांनी सांगितले. कराचीनजीकच्या मंगोपीर भागात पहाटे पोलिसांनी छापा टाकल्यावर चकमक झाली. यात अंधाराचा फायदा घेऊन काही दहशतवादी पळून गेल्याचा दावा त्यांनी केला. मात्र या वेळी झालेल्या जोरदार चकमकीत फिरदोस ठार झाला.

‘मोदींकडून आर्थिक सुधारणांची पावले नाहीत’
वॉशिंग्टन : बहुमताने सत्तेवर येऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेच्या शक्तीचा वापर आर्थिक सुधारणा राबवण्यासाठी पुरेशा प्रमाणात केला नाही असे अमेरिकी विद्वानांनी म्हटले आहे. राइस विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ रसेल ग्रीन यांनी सांगितले की, मोदी यांना इंदिरा गांधी यांना ७० व ८० च्या दशकात जशी पूर्ण बहुमताची सत्ता मिळाली होती तशी आता मिळाली आहे. त्यांना आर्थिक सुधारणा करून अलीकडील दशकात केलेल्या सुधारणा पुढे नेण्याची इच्छा आहे पण केवळ ते चमकोगिरी व विविध कार्यक्रमांमध्ये झळकण्यातच धन्यता मानत आहेत त्यांनी आपल्या अधिकारांचा वापर आर्थिक सुधारणांसाठी पुरेशा प्रमाणात केलेला नाही. ग्रीन हे काही काळ (२००८-२०११) अमेरिकेच्या अर्थमंत्रालयात भारतविषयक काम बघत होते . बेकर इन्स्टिटय़ूटचे विल क्लेटन फेलो ऑफ  इन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा मान मिळालेल्या ग्रीन यांनी सांगितले की, पुढील वर्षी तरी भारतात आर्थिक उदारीकरण व सरकारी प्रशासनात सुधारणा होईल अशी आशा करायला हरकत नाही.