नरेंद्र मोदी हे गुजरातमधील २००२च्या दंग्याप्रकरणी दोषी नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता तो मुद्दा नाही असे वक्तव्य लोकजनशक्ती पक्षाचे नेते व रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी केल्याने त्यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याच्या चर्चेला वेग आला आहे. बिहार भाजपच्या काही नेत्यांनी रामविलास पासवान यांच्याशी युती करण्यास विरोध केला आहे. पासवान भाजपबरोबर जात असतानाच राष्ट्रीय जनता दलात फूट पडली असून १३ फुटीर आमदारांपैकी सातजणांनी नितीश कुमार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपशी आघाडी करण्याबाबतचा निर्णय संसदीय मंडळ घेईल, असे चिराग यांनी स्पष्ट केले. लोकजनशक्ती २००२ पर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत होते.  बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाशी युतीसाठी लोकजनशक्ती पक्षाची चर्चा सुरू आहे मात्र जागावाटपावरून वाद सुरू असल्याने पक्षात नाराजी असल्याचे चिराग यांनी मान्य केले. बिहार भाजपमध्ये मात्र या युतीस तीव्र विरोध आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. ठोस काही घडले तरच सांगू, असे भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

राजदचे १३ आमदार फुटले
एकीकडे पासवान भाजपबरोबर जाण्याची चर्चा सुरु असतानाच राष्ट्रीय जनता दलाला फुटीमुळे लालूप्रसाद यादव यांना आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाच्या २२ पैकी १३ आमदारांनी फुटून नवा गट बनवला आहे. हा गट संयुक्त जनता दलामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यातील ६ जणांनी घूमजाव करत आपण फुटीर गटात नसल्याचे जाहीर केले आहे.सम्राट चौधरी यांच्या घरी या १३ आमदारांची बैठक झाली. यामध्ये पाच जण अल्पसंख्याक समुदायाचे आहेत. त्यांनी राजदमधून फुटून नितीशकुमार सरकारला पाठिंबा देत असल्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठविले आहे. पत्रातील स्वाक्षऱ्या खोटय़ा असल्याचे काही जणांनी सांगितल्याने या वादाला वेगळे वळण लागले आहे. १३ आमदारांनी अशा स्वरुपाचे पत्र पाठवल्याच्या वृत्ताला राजद आमदार जावेद इक्बाल अन्सारी यांनी दुजोरा दिला आहे. लालूप्रसाद यादव यांनी मात्र अशी कोणतीही फाटाफूट झाली नसल्याचा दावा केला आहे.