करोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे पुकारलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांच्या कसोटीचा काळ सुरु असताना शहरी व ग्रामीण भागात साप, मांजर, उंदीर तसेच पक्ष्यांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे आढळून येत आहे. तसा दावा महावितरणने अधिकृतपणे केला आहे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढली असतानाच त्यात काही भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडल्याने उकाडा आणखी वाढू लागला आहे. त्यामुळे विषारी-बिनविषारी सर्पांचा वावर वाढला आहे. शहरी व ग्रामीण भागात चार ते पाच फुटांचे मृत साप रस्त्यालगतचे फिडर पिलर्स, भूमिगत वीजवाहिन्यांच्या खोदकामात, रोहित्राच्या वीजयंत्रणेत, वीजखांबांवर आदी ठिकाणी दिसून आलेले आहेत. या सापांमुळे शॉर्टसर्किट झाल्याने वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. काही ठिकाणी दुरुस्तीची कामे करताना प्रामुख्याने फिडर पिलर्स किंवा भूमिगत वीजवाहिन्यांच्या खोदकामात जिवंत साप आढळून आलेले आहेत. अभियंता व जनमित्रांनी दुरुस्तीच्या कामांमध्ये सापांच्या अस्तित्वाची शक्यता पाहून योग्य खबरदारी घ्यावी व सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

याशिवाय प्रामुख्याने ग्रामीण भागात वीजखांबांच्या टोकावर प्रामुख्याने कावळा आणि त्यापेक्षा मोठय़ा आकाराचे पक्षी बसल्याने शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याचेही प्रकार दिसून येत आहेत.

सध्या कोरोना विषाणूंची आपत्ती सुरु असल्याने घरात साठलेला ओला व सुका कचरा वीजयंत्रणेजवळ टाकण्याचे  प्रकार आढळले आहेत. वीजयंत्रणेजवळ साठवलेला  कचरा पेटविण्याचे प्रकार घडत असल्यामुळे त्याचा फटका वीजयंत्रणेला बसत आहे.ओव्हरहेड वीज तारांखाली असलेला कचऱ्याचा ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका आहे.

महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कंपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घूस आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शॉर्टसर्किट होऊ न वीजपुरवठा खंडित होतो. प्राण्यांचा नाहक जीवही जातो. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेच्या परिसरात किंवा कंपाऊंडमध्ये ओला व सुका कचरा टाकण्याचे टाळावे असे आवाहन महावितरणने केले आहे.