एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणजे दुसरे जिना असल्याची टीका उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी केली आहे. अशा नेत्यांनीच मुस्लिमांना विभागलं असून त्यांना नष्ट केलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मुस्लीम समाज अजून एक जिना निर्माण होऊ देणार नाही असंही ते म्हणाले आहेत. बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर मुनव्वर राणा यांनी हे वक्तव्य केलं आहे. बिहारमध्ये एमआयएमने पाच जागा जिंकत महागठबंधनची विजयी घोडदौड रोखली आहे.

मुनव्वर राणा यांनी ओवेसी भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप केला आहे. “ओवेसी मुस्लिमांची मत विभागतात ज्याचा फायदा भाजपाला होतो,” असं ते म्हणाले आहेत. आपल्या वक्तव्यासंबंधी बोलताना पुढे ते म्हणाले की, “ओवेसी भाजपाचे दलाल असून नेहमीच मतांचं विभाजन करण्याचं काम करतात. असदुद्दीन आणि अकबरुद्दीन हे दोघे भाऊ माझ्या मते गुंड असून मुस्लिमांना आणि खासकरुन तरुणांना भरकवटत असतात. आपली १५ हजार कोटींची संपत्ती वाचवण्यासाठी ते मुस्लिमांच्या मतांचं विभाजन करुन ते थेट भाजपाला मदत करतात. यामध्ये मेडिकल कॉलेज, जमिनी आणि काही व्यवसाय आहेत”.

“बिहारमध्ये पाच जागा जिंकून ते मुस्लिमांना कोणता न्याय देणार आहेत? असदुद्दीन यांच्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहार फायद्याची ठिकाणं आहेत. उत्तर प्रदेशात जेव्हा कधी जातीय तणाव निर्माण होतो तेव्हा ओवेसी हैदराबादमध्ये लपतात,” असा आरोप मुनव्वर राणा यांनी केला आहे. साहित्य अकदामी पुरस्कार विजेते (२०१५ मध्ये त्यांनी परत केला) मुनव्वर राणा यांनी ओवेसी बिहारनंतर मुस्लीम मतांचं विभाजन करण्याचा पश्चिम बंगालच्या दिशेने जात आहेत. तर अमित शाह बंगाली हिंदू मतांचं विभाजन करणार असल्याचा आरोप केला आहे.