बिहारमधील गुन्हेगार आणि गुंडांना उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केलेली विनंती सध्या वादाचा विषय ठरली आहे. ‘मी गुन्हेगारांना हात जोडून विनंती करतो की किमान पितृपक्षाच्या काळात राज्यात गुन्हे करु नका’, असे विधान त्यांनी केले असून या विधानावरुन विरोधी पक्षांनी नितीशकुमार सरकारवर टीका केली आहे. सरकारने गुन्हेगारांसमोर नमते घेतल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे नुकतेच गयामधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. पितृपक्षात देशभरातून हिंदू भाविक मोठ्या संख्येने गया येथे पोहोचतात. गया येथे पिंड दान करण्यासाठी ते येतात. या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार मोदी म्हणाले, बाहेरुन येणाऱ्या एकाही व्यक्तीला तक्रार करण्याची संधी देऊ नका. मी गुन्हेगारांनाही विनंती करतो की कमीत कमी पितृपक्षाच्या काळात तरी लोकांना सोडून द्या. बाकीच्या वेळी आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही काही ना काही करत असता आणि पोलीसही त्यांच्या मागे लागलेलेच असतात. १० ते १५ दिवस चालणऱ्या या धार्मिक उत्सवात चुकीचे काम करू नका. बिहारची प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू नका, असे त्यांनी म्हटले आहे.

सुशील कुमार मोदी यांच्या विधानानंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत. ‘आता बिहारमधील सत्ताधाऱ्यांची जोडी गुन्हेगारांचे पाया पडताना दिसली तरी आश्चर्य वाटणार नाही, शेवटी पोलिसांपेक्षा जास्त एके ४७ गुन्हेगारांकडे आहेत, असा टोला राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी लगावला.