रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा हा सर्व भारतीयांसाठी चिंतेचा विषय आहे अशी प्रतिक्रिया आरबीआयचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी दिली आहे. राजीनामा देताना पटेल यांनी जे सांगितले आहे त्याचा आपण आदर केला पाहिजे. पण राजीनामा देण्याची परिस्थिती का निर्माण झाली ? त्याचा खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

पटेल यांचा राजीनामा सर्व भारतीयांसाठी चितेंचा विषय आहे. प्रगती आणि विकासासाठी संस्था भक्कम राहणे आवश्यक आहे असे राजन म्हणाले. रघुराम राजन यांच्या आरबीआय गर्व्हनरपदाचा कार्यकाळ सप्टेंबर २०१६ मध्ये पूर्ण झाला. त्यांचेही मोदी सरकारबरोबर अनेक मुद्यांवर मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांना गर्व्हनरपदी मुदतवाढ मिळाली नाही.

आता आरबीआयच्या संचालनाच्या पद्धतीत कमालीचा बदल झाल्याचे राजन यांनी सांगितले. आधी बोर्ड सल्लागाराच्या भूमिकेत होते. आरबीआयचे तज्ञ निर्णय घ्यायचे असे राजन म्हणाले. अलीकडे आरबीआयच्या बोर्डावर आरएसएसची विचारधारा मानणारे एस.गुरुमुर्ती आणि सहकारी बँक क्षेत्रातील तज्ञ एस.के.मराठे यांची बोर्डावर नियुक्ती करण्यात आली.

बोर्डाला जास्त अधिकार दिले तर बँकेच्या नियमन करण्याच्या व्यवस्थेवरचा तो आघात ठरेल असे मत राजन यांनी व्यक्त केले. सरकारकडून आरबीय कायद्याचा वापर होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाल्यापासूनच उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची शक्यता वर्तवली जात होती. ५५ वर्षीय उर्जित पटेल यांनी ५ सप्टेंबर २०१६ रोजी आरबीआयचे २४ वे गर्व्हनर म्हणून पदभार स्वीकारला होता. १९९२ नंतर सर्वात कमी कार्यकाळ भूषवणारे ते आरबीआयचे गर्व्हनर ठरले आहेत.