जम्मू काश्मीरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या १९ वर पोहोचली आहे.  उपचारादरम्यान रविवारी आणखी एका जवानाचा मृत्यू झाला. भारतीय सीमा सुरक्षा दलातील पिताबस मांजी या ओडिशासाच्या ३० वर्षीय जवानाने रुग्णालयात  अंतिम श्वास घेतला. उरी येथील लष्करी तळाला रविवारी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांशी लढा देताना मांजी गंभीर जखमी झाले होते. नौपाडा जिल्ह्यातील धानजोला गावातील पितांबस मांजी २००८ मध्ये सैन्यदलात भरती झाले होते. आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी घरी जाण्याचे ठरविले होते. उरी हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या जवानांवर लष्करी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

उरीतील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अडीच ते तीन तास चकमक झाली होती. हल्ला करणा-या चारही दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दहशतवाद्यांसमोर झुकणार नसल्याचे सांगत दहशतवाद्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. पंतप्रधानांनी केरळमधील खुल्या व्यासपीठावरुन पाकिस्तानवर कठोर कारवाईचे संकेत दिल्यानंतर रविवार मन की बात मध्येही पुन्हा शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे म्हटले होते.

दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले  तर ३० जण जखमी झाले होते.  सर्व जखमींना  लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  उपचारादरम्यान रविवारी आणखी एका जवानाचा मृत्यू झाला. त्यामुळे आता हल्ल्यात शहीद झालेल्यांची संख्या १९ वर पोहोचली आहे. उरीतील दहशतवादी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील चार जवानांना वीरमरण आले होते.