‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना; हल्ल्यामागच्या सूत्रधारांना शिक्षा करणारच

उरी हल्ल्यानंतर देशातील संतापाची भावना ही १९६५ च्या पाकिस्तान युद्धासारखीच आहे, या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडून शिक्षा केली जाईल, लष्कर काही बोलत नसते पण शौर्य दाखवत असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले.

शांतता, एकता व सुसंवाद हे कुठलाही प्रश्न सोडवण्याचे मार्ग आहेत. सर्व प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवता येतात असे त्यांनी काश्मीरमधील घडामोडींवरून सूचित केले. १८ सप्टेंबरच्या उरी हल्ल्याने देशाला धक्का बसला. सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. ज्यांनी आपली मुले, भाऊ, पती गमावले त्यांचीच हानी आहे असे नाही तर देशाची मोठी हानी आहे. या हल्ल्यातील सूत्रधारांना शिक्षा केली जाईल असे पुन्हा स्पष्ट केले.

आमचे सैन्य असे अनेक दहशतवादी कट उधळण्याइतके शूर व समर्थ आहे, त्यांच्यामुळे देशातील १२५ कोटी लोक शांततेने जीवन जगत आहेत. आमच्या सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. लोक व राजकीय नेते यांना बोलण्याची संधी मिळते. लष्कर बोलू शकत नाही, पण ते त्यांचे शौर्य दाखवत असते. उरी हल्ल्याबाबत अकरावीतील एका विद्यार्थ्यांने काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त करतानाच संतापाची भावना व्यक्त केली आहे, त्याने बऱ्याच विचाराअंती रोज तीन तास जास्त अभ्यास करून देशासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे. मुलाच्या सकारात्मक विचारांचे कौतुक करताना मोदी यांनी सांगितले की, देशातील लोकांच्या संतापाला अर्थ आहे, देशाच्या जागरूकतेचे ते लक्षण आहे. १९६५ मध्ये पाकिस्तानशी युद्ध झाले, तेव्हा लोकांमध्ये जी संतापाची लाट होती तशी उरी हल्ल्यामुळे तयार झाली आहे. त्या वेळी लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना युद्ध झाले, तेव्हा देशात पाकिस्तान विरोधात संतापाची भावना होती. राष्ट्रवादाचा ज्वर होता, प्रत्येक जण देशासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने भारलेला होता. त्या वेळी लालबहादूर शास्त्री यांनी देशाच्या भावना जगापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवल्या व ‘जय जवान-जय किसान’ असा नारा दिला. त्याने देशातील जनतेला प्रेरणा मिळाली होती. लष्कर त्यांची जबाबदारी पार पाडत आहे, सरकार त्याची जबाबदारी पार पाडत आहे. आता नागरिकांनी सकारात्मक योगदानातून राष्ट्रवादाची भावना जागवली तर देश नव्या उंचीवर जाईल.

काश्मीरमधील महाविद्यालये व शाळा सुरळीत चालाव्यात अशी पालकांची इच्छा आहे. शेतक ऱ्यांना त्यांचा माल बाजारपेठेत जावा असे वाटते. काश्मीरमध्ये आर्थिक व्यवहार पुन्हा सुरळीत होणे महत्त्वाचे आहेत. गेल्या काही दिवसांत व्यापारी उलाढाली सुरूही झाल्या आहेत. शांततामय मार्गाने संवाद करून सर्व प्रश्न सोडवता येतील व काश्मीरमधील भावी पिढय़ांचे भवितव्य घडवता येईल, तेथील लोकांची जबाबदारी सरकारची आहे, कायदा व सुव्यवस्थेसाठी अधिकाऱ्यांनी काही उपाययोजना केल्या, त्यात दगडफेक करणाऱ्या निदर्शकांविरोधात कठोर कारवाईत काही लोकांचा मृत्यू झाला, सुरक्षा दलांनी त्यांच्या क्षमता, कायदे, नियम हे योग्य प्रकारे, संयमाने वापरून कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देशद्रोह्य़ांशी चर्चा नाही – शहा

घटनेवर ज्यांचा विश्वास नाही किंवा जे स्वताला भारतीय समजत नाहीत त्यांच्याशी केंद्र चर्चा करत नाही असा संदेश पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी काश्मीरी फुटीरतावाद्यांना दिला. काश्मीर भारतापासून तोडण्याची दिवास्वप्ने कुणी पाहू नयेत अशा इशारा शहा यांनी राष्ट्रीय परिषदेतील भाषणात दिला. पुढील वर्ष गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा त्यांनी केली.

काश्मिरी जनतेशी संवाद

पस्तीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी काश्मिरी जनतेशी आपण बोलू इच्छितो, असे सांगून तेथील लोकांना आता देशविघातक शक्ती कळल्या आहेत. वास्तव समजल्याने लोक या शक्तींपासून दूर जात असून शांततेच्या मार्गाने जाणे त्यांनी सुरू केले आहे.

शहिदांची संख्या १९

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये उरी येथे पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या १९ झाली आहे. उपचारादरम्यान रविवारी आणखी एका जवानाचा मृत्यू झाला आहे. पिताबस मांजी असे या ३० वर्षीय जवानाचे नाव असून, त्याने ओडिशाच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दहशतवाद्यांशी लढताना मांजी गंभीर जखमी झाले होते.

‘ही तर पाकची बदनामी’

इस्लामाबाद : पाकिस्तान हा दहशतवादाची निर्यात करत असल्याची प्रक्षोभक वक्तव्ये करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘बेजबाबदार वागणुकीचे’ प्रदर्शन करत असल्याचा आरोप पाकिस्तानने सोमवारी केला. मोदी यांची वक्तव्ये म्हणजे काश्मीरच्या मुद्दय़ावरून लक्ष वळवण्यासाठी ‘सुनियोजित पद्धतीने आखलेल्या बदनामीच्या मोहिमेचा’ भाग असल्याची टीका पाकने केली आहे.

केरळमधील जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी पाकिस्तानची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला, असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाने एका निवेदनात सांगितले. सर्वोच्च राजकीय पातळीवर अशा प्रकारच्या वर्तणुकीचे प्रदर्शन खेदजनक असल्याचे यात म्हटले आहे.