जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये आज सकाळी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराच्या जवानांनी तो उधळून लावला आहे. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान जखमी झाले आहेत.

उरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ सीमेपलिकडून पाच ते सहा दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला. त्यानंतर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. गेल्या वर्षी उरी येथील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १९ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर उरीत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, माछिल सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला होता. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. माछिल सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री उशीरा सीमा रेषेवर तीन दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे सैन्याच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक झाली होती. त्यात तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.