गुढीपाडव्यानिमित्त शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रांना शनिवारी राजकीय रंग चढला. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर विविध पक्षाच्या बहुतांश उमेदवारांनी या शोभायात्रांच्या निमित्ताने मतदारांचे लक्ष वेधून घेतले.

उत्तर मुंबईतील महाआघाडीच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मतदारसंघातील एका शोभायात्रेत सहभागी लेझीम पथकासोबत ताल धरला. त्यांच्याप्रमाणे ईशान्य मुंबईतील युतीचे उमेदवार मनोज कोटक, विद्यमान खासदार किरीट सोमैया पूर्व उपनगरांतील शोभायात्रांमध्ये सहभागी झाले. कोटक यांनी पालखी खांद्यवर घेतली, अब्दागिरी नाचवून उपस्थितांचे लक्ष वेधले. याच मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजय दिना पाटीलही शोभा यात्रांमध्ये सहभागी झालेले दिसले. दक्षिण मध्य मुंबईतील युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन मतदान करा, हक्क बजावा, असा संदेश दिला.

शहरातील प्रत्येक मतदारसंघातील विविध पक्ष, युती किंवा आघाडीचे उमेदवार, त्यांचे प्रमुख कार्यकर्ते शनिवारी शोभा यात्रांमध्येच दिसत होते. काही ठिकाणी जास्त गर्दी गोळा करण्यासाठी किंवा शोभा यात्रा परिसरात सर्वाचेच लक्ष वेधून घेईल यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनाही आमंत्रणे देण्यात आली होती.