पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत दिलेल्या वक्त्यव्यांची सध्या सर्वत्रच चर्चा होत आहे. त्यातच एका मुलाखतीत त्यांनी एअर स्ट्राईकपूर्वी ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला दिल्याचे म्हटले होते. तसेच मोदींचं ते विधान गुजरात भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही ट्विट करण्यात आलं होतं. मात्र, सोशल मीडियामध्ये खिल्ली उडायला सुरूवात झाली होती. आता त्याच वक्तव्यावरून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी पंतप्रधानांची फिरकी घेतली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून आपल्या पाळीव श्वानासोबत एक फोटो शेअर केला आहे. सध्या आकाशात काळे ढग नसल्यामुळे रोमिओचे कानही रडारचे सिग्नल पकडू शकत आहेत, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

यापूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. मोंदीचे राजकारणातील सत्य समोर आल्यानंतर ते जनतेच्या रडारवर आल्याचे त्या म्हणाल्या होत्या. तसेच पाऊस असो किंवा स्वच्छ वातावरण असो त्यांच्या राजकारणाचे सत्य सर्वोसमोर आल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींना खरमरीत टोला लगावला होता. ”मोदींजींच्या या शोधामुळे जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत! येत्या जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत मान्सूनमुळे देशातील सगळ्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा!” अशाप्रकारची पोस्ट आव्हाड यांनी फेसबुकवर केली होती.