अमेरिकेत करोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नियोजित अध्यक्ष जो बायजेन यांनी १.९ लाख कोटी डॉलर्सची मदत योजना जाहीर केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातून थेट आर्थिक लाभ देण्यात येणार असून राष्ट्रीय लस योजनेला पाठबळ व उद्योगांना मदत हेही या योजनेचे उद्देश आहेत.

गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या या मदत  योजनेत कोविड १९चा सामना करण्यासाठी ४१५ अब्ज डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली असून १ लाख कोटी डॉलर्स हे लोक व कुटुंबे यांना थेट मदत हस्तांतरासाठी ठेवण्यात आले आहेत, तर उद्योगांना मदतीसाठी ४४० अब्ज डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त चौदाशे डॉलर्स हे अमेरिकी लोकांना बेरोजगारी कार्यक्रमाअंतर्गत मार्च मध्यापासून सप्टेंबर अखेरीपर्यंत मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या कालावधीची व्याप्ती वाढवण्यात आली असून आर्थिक मदत ही ३०० डॉलर्सवरून ४०० डॉलर्स करण्यात आली आहे. संघराज्य किमान वेतन तासाला १५ डॉलर्स करण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी २० अब्ज डॉलर्स बाजूला काढण्यात आले असून शतकांमधील एका मोठय़ा आर्थिक पेचास आपण तोंड देत आहोत. त्यात अनेक लोकांना फटका बसला आहे. त्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, असे विलमिंग्टन येथून बोलताना नियोजित अध्यक्ष बायडेन यांनी सांगितले.

एका वर्षांत चार लाख अमेरिकी लोकांनी करोनामुळे प्राण गमावले असून अनेकांच्या नोक ऱ्या गेल्या. १८ दशलक्ष अमेरिकी लोक बेरोजगार विम्यावर जगत असून चार लाख लहान उद्योग कायमचे बंद झाले आहेत. बायडेन हे सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनात मदत योजना जाहीर करणार आहेत. भाडय़ाने राहणाऱ्या १४ दशलक्ष लोकांना भाडे थकल्याने घराबाहेर हाकलले जाण्याची भीती आहे, त्यांना मदत केली जाणार आहे.

शपथविधी कार्यक्रमात लेडी गागा, जेलो

पॉप कलाकार जेनीफर लोपेझ व लेडी गागा हे ‘अ ’ वर्गातील कलाकार नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधी कार्यक्रमात २० जानेवारीला कार्यक्रम सादर करणार आहेत. सौंदर्य व फॅशन या क्षेत्रात नावाजलेली लेडी गागा राष्ट्रगीत सादर करणार आहे, तर लोपेझ ही युएस कॅपिटॉलमध्ये  कार्यक्रम सादर करणार आहे.