वॉशिंग्टन : करोनाच्या महासाथीने प्रभावित झालेल्या अमेरिकेच्या ५० पैकी ३५ राज्यांनी सर्व व्यवहार पुन्हा सुरू करण्याच्या औपचारिक योजना जाहीर केल्या असून; ‘अदृश्य शत्रूने’ जोरदार फटका दिलेल्या या देशासाठी ‘यापेक्षा बरेच चांगले दिवस’ पुढे वाढून ठेवले आहेत, असा विश्वास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

करोना विषाणूमुळे बुधवापर्यंत ६१ हजार अमेरिकी नागरिकांनी प्राण गमावले असून, १० लाखांहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. जगभरातील कुठल्याही देशातील ही सर्वाधिक संख्या आहे.

‘या अदृश्य शत्रूमुळे गमावलेल्या प्रत्येक जीवाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. ही महासाथ मोठे क्लेश आणि व्यथा मागे ठेवून गेली आहे, याचे आम्हाला दु:ख वाटते,’ असे ‘ओपनिंग अप अमेरिका अगेन’ या विषयावर उद्योगातील प्रतिनिधींसोबत बुधवारी व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेतील बहुतांश उद्योग व कारखान्यांतील व्यवहार बंद असून, देशाच्या ३३० दशलक्ष लोकसंख्येपैकी ९५ टक्क्यांहून अधिक लोक घरीच अडकले आहेत. २६ दशलक्ष अमेरिकी लोकांनी बेरोजगारीच्या सुविधांसाठी अर्ज केले असून, हा आकडा ३० दशलक्षांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.

अमेरिकेची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. पहिल्या तिमाहीत ती उणे ४.८ टक्क्यांनी वाढली. चौथ्या तिमाहीपर्यंत अर्थव्यवस्था रुळांवर येईल, असा विश्वास ट्रम्प यांनी बुधवारी व्यक्त केला.

‘आम्ही खरेच एक मोठी सीमा ओलांडली असल्याचे आणि आगामी दिवस बरेच चांगले असतील असे मला वाटते. करोनाविरुद्धच्या लढय़ात मला पुढे प्रकाश दिसतो,’ असे ट्रम्प म्हणाले.