नऊ वर्षांच्या दीर्घ बहिष्कारानंतर अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांच्यासमवेत दीर्घ चर्चा केली. आगामी निवडणुकीनंतर सत्तारूढ होणाऱ्या सरकारसमवेत सहकार्य करण्याची आपल्या सरकारची इच्छा असल्याचे मत पॉवेल यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी नंतर पंतप्रधानपदी आरूढ झाल्यास त्यांच्यासमवेत काम करण्यास आपल्या सरकारला कोणतीही अडचण येणार नसल्याचे संकेत पॉवेल यांनी यानिमित्ताने दिले.
भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून यापुढेही भारतीय नागरिक जे सरकार निवडतील, त्यांच्यासमवेत आम्ही निश्चित सहकार्य करू, असे पॉवेल यांनी स्पष्टपणे नमूद केले. पॉवेल यांच्या दूताने उभयतांच्या भेटीनंतर एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. मोदी आणि पॉवेल यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. गुजरात सरकारची कार्यप्रणाली अत्यंत चांगली असल्याचे कौतुक करतानाच त्यांचे हे मॉडेल जगाच्या अन्य भागांतही नेता येईल, असे मत पॉवेल यांनी व्यक्त केले.
पॉवेल यांनी दोन दशकांनंतर गुजरातला भेट दिल्यानंतर त्यांना राज्यातील वातावरण गुंतवणुकीस अत्यंत पोषक असे आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्यासंबंधीचा मुद्दा मोदी यांनी पॉवेल यांच्याकडे उपस्थित केला असता, या मुद्दय़ाचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन पॉवेल यांनी मोदी यांना दिले.
काँग्रेसचा थंड प्रतिसाद
नॅन्सी पॉवेल आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीसंबंधी थंड प्रतिसाद व्यक्त करून मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला तरी निराश होणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली.
मोदी यांना व्हिसा मिळाला नाही तेव्हा आम्ही आनंद व्यक्त केला नाही. त्याचप्रमाणे आता तो मिळाल्यास आम्ही निराशही होणार नाही, असे परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी नवी दिल्ली येथे सांगितले.