देशात लोकसभा निवडणूक प्रचाराच्या गदारोळात अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी सोमवारी पदाचा राजीनामा दिला. यूपीएतील परराष्ट्र व्यवहार धोरणकर्त्यांशी जवळीक असल्याने पॉवेल यांना अमेरिकेत तातडीने माघारी बोलावून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे अमेरिकेचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीनंतर मोदी यांचे सरकार सत्तेत येईल असे गृहीत धरूनच ओबामा प्रशासनाने पॉवेल यांना माघारी बोलावण्याचे संकेत दिले होते. गेल्याच आठवडय़ात तसे वृत्तही प्रसारित झाले होते. अखेरीस सोमवारी पॉवेल यांनी राजीनामा देऊन संकेतांना दुजोराच दिला. पॉवेल या यूपीएला जास्त अनुकूल असल्यामुळेच त्यांची गच्छंती झाली असावी अशी चर्चा आहे. मे अखेरीस डेलवेअर या मूळ गावी परतण्याची पॉवेल यांची इच्छा होती.