दक्षिण चीन सागरावरुन चीन आणि अमेरिकेमध्ये सुरु असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक प्रखर होऊ लागला आहे. दक्षिण चीन सागरावरील चीनची वर्चस्ववादाची भूमिका अमेरिकेला अजिबात मान्य नाहीय. त्यामुळे अमेरिकेच्या युद्धनौका नेहमीच या भागात गस्त घालत असतात. सप्टेंबर महिन्यात अशाच एका गस्ती मोहिमेदरम्यान दोन्ही देशांच्या युद्धनौकांमधल्या संघर्षामुळे भीषण परिस्थिती उदभवू शकली असती.

सप्टेंबरमध्ये दक्षिण चीन सागरात अमेरिकेची विनाशिका दिसल्यानंतर चीनच्या युद्धनौकेने तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात असा अमेरिकेन विनाशिकेला इशारा दिला. त्यानंतर चीनची युद्धनौका अत्यंत धोकादायक पद्धतीने अमेरिकन विनाशिकेच्या जवळ गेली. त्यामुळे दोन्ही जहाजांमध्ये टक्कर होईल अशी स्थिती निर्माण झाली होती.

अमेरिकन विनाशिका डिकॅटयुरने शिट्टी वाजवून चिनी युद्धनौकेला सावध करण्याचा प्रयत्न केला पण चीनच्या युद्धनौकेने त्याची अजिबात दखल घेतली नाही. ते वेगाने अमेरिकन विनाशिकेच्या दिशेने गेले. ते आम्हाला मार्गातून हटवण्याचा प्रयत्न करत होते असे एका अमेरिकन खलाशाने सांगितले.

डिकॅटयुर विनाशिका उजव्या बाजूला वळल्याने सुदैवाने ही धडक टळली. सप्टेंबर महिन्यात हा संघर्ष झाला. जर ही धडक झाली असती तर जहाजाच्या नुकसानीबरोबर दोन्ही बाजूला प्राणहानी झाली असती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा तणाव निर्माण होऊ शकला असता असे नाव न छापण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले.

दक्षिण चीन सागरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर डोळा ठेऊन चीनने तिथे अनेक कृत्रिम बेटे तयार केली आहेत. चीनचा अनेक शेजारी देशांबरोबर दक्षिण चीन सागराच्या मालकीवरुन मोठा वाद सुरु आहे. अमेरिकेला चीनची ही दादगिरी अजिबात मान्य नाहीय. त्यामुळे अमेरिकन नौदलही या भागात मोठया प्रमाणावर सक्रिय आहे.