MH 60 Romeo Seahawak: अमेरिकेने सुमारे २.४ अब्ज डॉलर किमतीचे २४ बहुपयोगी ‘एमएच ६० रोमिओ सी हॉक’ हेलिकॉप्टरची भारताला विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. भारताला मागील एक दशकाहून अधिक काळापासून इन हंटर हेलिकॉप्टरची गरज होती. लॉकहिड मार्टिनद्वारे निर्मित हेलिकॉप्टर पाणबुडी आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहेत. हे हेलिकॉप्टर जगातील सर्वांत अत्याधुनिक समुद्री हेलिकॉप्टर मानले जातात. यामुळे भारतीय नौदलाची मारक क्षमता वाढणार आहे.

ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी २४ एमएच ६० आर बहुपयोगी हेलिकॉप्टरच्या विक्रीस मंजुरी दिली. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय संरक्षण दल आणखी मजबूत होणार आहे. अमेरिकेने अधिसूचनेत म्हटले आहे की, प्रस्ताविक विक्रीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक संबंध आणखी मजबूत होतील. त्याचबरोबर अमेरिकेची विदेश नीती आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होण्यास मदत मिळेल.

या हेलिकॉप्टरची अंदाजे किंमत ही २.४ अब्ज डॉलर असेल. यामुळे क्षेत्रीय संकटांना सामोरे जाण्यास भारताला मदत मिळेल आणि त्यांची गृह सुरक्षाही मजबूत होईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. हेलिकॉप्टर विक्रीमुळे खंडातील सैन्य संतुलन बिघडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे हेलिकॉप्टर जगातील सर्वांत अत्याधुनिक समुद्री हेलिकॉप्टर मानले जातात. यामुळे भारतीय नौदलाची मारक क्षमता वाढेल. तज्ज्ञांच्या मते हिंद महासागरात चीनचे आक्रमक धोरण पाहता भारतासाठी ‘एमएच ६० रोमिओ सी हॉक’ हेलिकॉप्टर आवश्यक होते.