वेगाने पसरणाऱ्या करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेने चीन व इतर प्रभावित देशांना १० कोटी डॉलर इतकी मदत देऊ केली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले की, या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेतील खासगी क्षेत्रातील व्यक्तींनी मोठय़ा प्रमाणात देणग्या दिल्या आहेत. त्याशिवाय आम्ही  १० कोटी डॉलरची मदत देणार आहोत. उर्वरित जगानेही या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करावी. अमेरिका ही मदत थेट देईल किंवा बहुदेशीय संघटनांच्या मार्फत देईल. अमेरिकी सरकारने ठेवलेल्या संकीर्ण निधीतून ही मदत दिली  जाणार आहे.

अमेरिकेने परदेशी नागरिकांना चीनमध्ये प्रवासावर बंदी घालून घबराट निर्माण केली आहे अशी टीका चीनने केली होती, तरीही अमेरिकेने ही मदत देऊ केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनने आतापर्यंत करोना विषाणूची समस्या ज्या प्रकारे हाताळली त्याची प्रशंसा केली आहे. चीनचा प्रतिसाद हा अतिशय व्यावसायिक होता, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी दूरध्वनीवर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी याबाबत चर्चा केली.

वैद्यकीय सामग्री रवाना

पॉम्पिओ यांनी सांगितले की, अमेरिकेने १७.८ लाख टन वैद्यकीय सामग्री चीनला पाठवली आहे. त्यात मास्क, गाऊन, गॉझ (कापूस), श्वासोच्छवास यंत्रे यांचा समावेश आहे. आतापर्यंत १२ देशातील ३१ हजार लोकांना विषाणूची लागण झाली आहे.

हुबेईतून केरळचे १५ विद्यार्थी विमानाने परत

कोची : चीनमधील विषाणूग्रस्त हुबेई प्रांतात अडकून पडलेले १५ केरळी विद्यार्थी  विमानाने परत आले आहेत. कोची विमानतळावर त्यांचे विमान उतरले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. ते हुबेई प्रांतात बराच काळ अडकून पडले होते. क्युनमिंग विमानतळावरून ते बँकाकला आले व नंतर एअर आशियाच्या विमानाने कोचीला आले. शुक्रवारी रात्री अकरा वाजता हे विमान कोचीला आले, तेव्हा या विद्यार्थ्यांना थेट कलामसेरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यासाठी पाच जंतुविरहित रुग्णवाहिका वापरण्यात आल्या. नंतर त्यांना या रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर आले होते पण त्यांना भेटण्यापासून रोखण्यात आले, कारण विषाणू प्रसाराचा धोका होता.