अफगाणिस्तानातील लोक त्यांचे भवितव्य स्वत:च ठरवतील, पण या प्रक्रियेत अफगाणिस्तानातील नेत्यांच्या पाठीशी अमेरिका खंबीरपणे उभी आहे, असे आश्वाासन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे अफगाणिस्तानातील समपदस्थ अशरफ घनी यांना दिले. अमेरिकी सैन्य सप्टेंबरपर्यंत युद्धग्रस्त अफगाणिस्तानातून माघारी जाईल असे असले तरी आमचा देश अफगाणिस्तानच्या सदैव पाठीशी राहील असेही ते म्हणाले.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी व  बायडेन यांची शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये बैठक झाली. त्यानंतर बायडेन यांनी सांगितले की, यापुढेही दक्षिण आशियातील एक प्रमुख देश असलेल्या अफगाणिस्तानशी अमेरिकेची भागीदारी कायम राहील. दोन्ही देशातील भागीदारी संपणार नाही तर ती वाढतच जाईल असे बायडेन यांनी व्हाइट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात घनी व अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.