उद्योगपती जॉर्ज सोरोस यांची टीका

दावोस : लोकशाही पद्धतीने निवडून आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्धस्वायत्त मुस्लीमबहूल काश्मीरवर निर्बंध लादून हिंदूराष्ट्र निर्माण करीत आहेत, असा हल्ला उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी शुक्रवारी केला.

दावोस येथील भाषणात सोरोस यांनी नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका केली. भारतातील वाढत्या हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्यावर ते म्हणाले, राष्ट्रवाद हा भारतासाठी सर्वात मोठा आणि भीतीदायक असा धक्का आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले मोदी भारताला हिंदू राष्ट्र बनवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काश्मीरवर निर्बंध लादले आहेत आणि कोटय़वधी मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व हिरावण्याची भीती दाखवत आहेत.

सोरोस यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘आर्थिक पथक’ अर्थव्यवस्थेचा मुद्दा अधिक  तापवत आहे, परंतु अशा प्रकारची कृती फार काळ सुरू ठेवता येत नाही. ट्रम्प खोटारडे आणि आत्मकेंद्री असून सर्व जगाने आपल्याभोवती फिरावे, असे त्यांना वाटते, अशी टीकाही सोरोस यांनी केली.