सीरियात रासायनिक अस्त्रांच्या हल्ल्यात अनेक निरपराध लोकांचा बळी गेल्याच्या विरोधात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांनी सीरियात जोरदार हल्ले केले. एकूण ११० हून अधिक क्षेपणास्त्रे राजधानी दमास्कससह इतर भागांत डागण्यात आली असून, यातील बरीच क्षेपणास्त्रे हाणून पाडल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी केला आहे. रासायनिक हल्ल्यानंतर क्षेपणास्त्र हल्ल्यांचे सूतोवाच अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यानंतर असे हल्ले होणार हे अपेक्षित होते. रासायनिक हल्ले करणारा सीरिया हा गुन्हेगारीचा राक्षस आहे असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.व्हाइट हाऊस येथे हल्ल्याची घोषणा करताना ट्रम्प यांनी सांगितले, की सीरियाला रासायनिक हल्ल्यापासून रोखण्यास आम्ही रशियाला अनेकदा बजावले होते, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा हल्ला करण्यात आला आहे. सीरियाची राजधानी दमास्कस येथे स्फोटांचे अनेक आवाज आले. हा हल्ला अतिशय जोरदार होता, त्यामुळे सात वर्षांच्या नागरी युद्धाला वेगळे वळण लागले आहे.

पहाटेपासून स्फोटांचे आवाज

एएफपीच्या प्रतिनिधीने सांगितले, की पहाटे चार वाजता स्फोटांचे आवाज झाले. त्यानंतर विमानांचा आवाज आला. राजधानीच्या उत्तर व पूर्वेकडे धुराचे लोट दिसत होते. पहाटेनंतर सीरियाच्या राजधानीत हल्ल्यांच्या निषेधार्थ ध्वज अध्र्यावर उतरवण्यात आले. विशिष्ट भागात हल्ले करून लक्ष्यभेद करण्याचा आदेश अमेरिकी सैन्याला दिला आहे असे ट्रम्प यांनी सांगितले. सीरियाचे हुकूमशाह बशर अल असाद यांच्या रासायनिक शस्त्रसाठय़ांना यात लक्ष्य करण्यात आले. ब्रिटन व फ्रान्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा हल्ला करण्यात आला. त्या देशांचा ट्रम्प यांच्या भूमिकेस पाठिंबा आहे. डौमा येथे गेल्या आठवडय़ात असाद राजवटीने केलेल्या रासायनिक हल्ल्यात ४० जण ठार झाले होते. त्या हल्ल्यात रासायनिक अस्त्रांचा झालेला वापर हा सीरियाकडील रासायनिक अस्त्रांच्या प्रसाराचे निदर्शक होते. या हल्ल्यात आई, वडील, मुले, बालके सगळेच वेदनेने तडफडत मरण पावले. ही कृती माणसाची नाही तर राक्षसाची आहे.

अचूक निशाणा- डनफर्ड

अमेरिकेचे वरिष्ठ जनरल जोसेफ डनफर्ड यांनी सांगितले, की आम्ही हल्ल्यात दमास्कसमधील लक्ष्यांवर अचूक निशाणा साधला आहे. दमास्कस व होम्स प्रांत येथे वैज्ञानिक संशोधन केंद्र, साठवण सुविधा व कमांड पोस्ट यांवर हल्ले चढवण्यात आले. सीरियाने म्हटले आहे, की हल्ल्यातील क्षेपणास्त्रे निकामी करण्यासाठी संरक्षण प्रणाली सुरू करण्यात आली, त्यामुळे आकाशात धुराचे लोट दिसत होते.

क्षेपणास्त्र हल्ला म्हणजे सीरियावर आक्रमणच- पुतिन

एपी, मॉस्को : अमेरिका व मित्र देशांनी सीरियात केलेला क्षेपणास्त्र हल्ला म्हणजे आक्रमणच असून आम्ही त्याचा निषेध करतो, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या कृतीमुळे सीरियातील पेचप्रसंग चिघळणार आहे असे सांगून ते म्हणाले की, अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी केलेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंम्डळाची बैठक बोलावण्याची मागणी आम्ही केली आहे. या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय संबंधांवर वाईट परिणाम होणार आहेत. रशियाच्या लष्करी तज्ज्ञांनी डौमा येथे तपासणी केली असता तेथे रासायनिक अस्त्रांचा अंशही सापडला नाही. अमेरिका व मित्र देशांनी आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी तेथे भेट देऊन अहवाल देण्याची वाटही न पाहता हा हल्ला केला.

सीरियाने क्षेपणास्त्रे पाडली

दमास्कस येथे नेघप हॅमंड यांनी असा दावा केला, की अमेरिकी क्षेपणास्त्रे मोठय़ा प्रमाणात दिसली. त्यांना जे करायचे ते करू द्या, ज्यांना मारायचे त्यांना मारू द्या, सीरियाने अमेरिकेची क्षेपणास्त्रे पाडली याची नोंद इतिहासात होईल. आम्ही केवळ क्षेपणास्त्रेच पाडली नाहीत तर अमेरिकेचा उर्मटपणाही खोडून काढला आहे असे त्याने सांगितले.  सीरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा क्रूर, नृशंस आक्रमण अशा शब्दांत निषेध केला असून, दमास्कस येथे आजपासून रासायनिक अस्त्रांची तपासणी सुरू होणार होती, पण त्याआधीच हा हल्ला केल्याने रासायनिक अस्त्रे वापरत नसल्याचे आमचे म्हणणे तपासण्याआधीच संधी न देता हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

ब्रिटनच्या स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांचा वापर

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे, की चार ब्रिटिश टॉर्नेडो जेटस यात सहभागी होते. त्यातून स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या वेळी  होम्स शहराला लक्ष्य करण्यात आले. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सांगितले, की सीरियात रासायनिक अस्त्रांचा वापर नित्याचा होऊ नये यासाठी आम्ही हल्ल्यात सहभाग घेतला. रशियन डबल एजंटच्या हत्येच्या प्रयत्नांचा उल्लेख करून त्या म्हणाल्या, की ही रासायनिक अस्त्रे उद्या ब्रिटनमध्ये किंवा जगात अन्य कुठे वापरली जाऊ शकतात. रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिका व रशिया यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली होती सीरियातील असाद राजवटीने हा रासायनिक हल्ला केल्याचा रशियाने इन्कार केला व ब्रिटननेच हे घडवून आणले असा उलट आरोप केला.

शंभर क्षेपणास्त्रे डागली

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे, की सुमारे शंभर क्षेपणास्त्रे अमेरिकेने डागली. त्यातली बहुतांशी आम्ही पाडली. पाश्चिमात्य देशांच्या हल्ल्यात रशियाचे हवाई संरक्षण असलेल्या भागात एकही क्षेपणास्त्र घुसू शकले नाही. डौमा येथील रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिकी आघाडीचा हल्ला अपेक्षित होता. अमेरिकेच्या कारवाईत सामील  झालेल्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सांगितले, की रासायनिक अस्त्रांचा वापर आम्ही सहन करणार नाही. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांनी म्हटले आहे, की फ्रान्सने भूमध्य सागरातून क्रूझ क्षेपणास्त्रे टाकली. काही लढाऊ जेट विमानेही पाठवण्यात आली.

दहशतवादाविरोधात लढण्याचा निर्धार आणखी पक्का- असाद

दमास्कस : पाश्चिमात्य देशांनी सीरियावर केलेल्या हल्ल्यातून आमचा दहशतवादाविरोधात लढण्याचा निश्चय आणखी पक्का झाला आहे, असे सीरियाचे अध्यक्ष बशार अल असाद यांनी म्हटले आहे. त्यांच्या कार्यालयाने त्यांच्या प्रतिक्रियेबाबत निवेदन जारी केले, त्यात म्हटल्यानुसार सीरिया व तेथील लोक अमेरिका व पाश्चात्त्य देशांच्या हल्ल्याने आता दहशतवादाविरोधात आणखी वज्रनिर्धाराने लढण्यास सज्ज आहेत. इराणचे समपदस्थ हासन रुहानी यांच्याशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

बराच रासायनिक अस्त्रसाठा नष्ट ; फ्रान्सचा दावा

पॅरिस : सीरियात करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तेथील रासायनिक अस्त्रसाठय़ाचा बराच भाग नष्ट झाला आहे, असा दावा फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन वेस ल ड्रायन यांनी केला आहे. त्यांनी सांगितले, की अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन यांच्या हल्ल्यात सीरियाची बहुतांश रासायनिक शस्त्रे नष्ट झाली.  फ्रान्सची गुप्तचर यंत्रणा भक्कम आहे, त्यामुळे सीरियातील असाद यांची राजवटच डौमा येथे गेल्या आठवडय़ात करण्यात आलेल्या रासायनिक हल्ल्यास जबाबदार आहे हे आम्हाला पक्के ठाऊक होते. रासायनिक अस्त्रांच्या वापराबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की यात धोक्याची रेषा ओलांडली जायला नको होती. पुन्हा जर ती ओलांडली गेली तर आम्ही पुन्हा हल्ला करू. पण आता सीरियाला धडा मिळाला असेल अशी आशा वाटते.

सीरियाला शिक्षा योग्यच- इस्त्रायल

जेरुसलेम : सीरियात रासायनिक अस्त्रांचा मारा करून निरपराध लोकांचा बळी घेणाऱ्या असाद राजवटीविरोधात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीने केलेला क्षेपणास्त्र हल्ला योग्यच असून, सीरियाचे कृत्य भीषण होते. त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवीच होती असे इस्त्रायलने म्हटले आहे.

हल्ल्यांना पाठिंबाच- ब्रिटन

अमेरिकेने सीरियात केलेल्या हवाई हल्ल्यांना ब्रिटनने सक्रिय पाठिंबा दिला, असे परराष्ट्र मंत्री बोरिस जॉनसन यांनी सांगितले. सीरियातील महत्त्वाच्या रासायनिक अस्त्र ठिकाणांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचे आम्ही स्वागतच करतो. रासायनिक अस्त्रांच्या वापराविरोधात जगातील सुसंस्कृत देशांची एकजूट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प, मे, मॅक्रॉन हे गुन्हेगारच – इराण

तेहरान : सीरियात करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यास जबाबदार असणारे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांचे फ्रान्समधील समपदस्थ इमॅन्युएल मॅक्रॉन व ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे हे सगळेच गुन्हेगार आहेत, असे इराणचे सर्वोच्च नेते अयोतल्ला अली खामेनी यांनी म्हटले आहे. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. सीरियात आज सकाळी जे हल्ले करण्यात आले तो मोठा गुन्हा आहे. त्यासाठी ट्रम्प, मे व मॅक्रॉन हे जबाबदार असून ते तिघेही गुन्हेगार आहेत, असे त्यांनी सांगितले.

या हल्ल्याचे प्रादेशिक परिणाम फार वाईट होतील, असे सांगून इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की अमेरिका व  त्यांच्या मित्र देशांकडून सीरियाच्या रासायनिक अस्त्रांबाबत कुठलेही पुरावे नसताना हा हल्ला करण्यात आला. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा अहवाल येण्याची वाटही बघितली गेली नाही हे मोठे दुर्दैव आहे. या दु:साहसी हल्ल्याच्या परिणामांना हे देश जबाबदार आहेत. आंतरराष्ट्रीय नियम व कायद्यांचे यामुळे उल्लंघन झाले आहे. इराण व रशिया हे देश सीरियाचे पाठीराखे असून तेच अध्यक्ष बशर अल असाद यांना सल्ले देत आहेत. तेथे त्यांचे सैन्यही आहे.

सीरिया सरकारने बंडखोरांविरोधात चांगली कारवाई केली होती पण ते यश न पाहवल्याने अमेरिका व मित्र देशांनी रासायनिक अस्त्रांचे कारण सांगून हा हल्ला केला. हे आक्रमण ठरवून करण्यात आले.