इराणकडून अणुभट्टय़ांसाठी लागणारे ३२ मेट्रिक टन जडपाणी विकत घेणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अण्वस्त्र विकसनात जडपाणी हा महत्त्वाचा घटक असतो. या जडपाण्यासाठी अमेरिका ८६ लाख अमेरिकी डॉलर्स इतकी किंमत इराणला देणार आहे. इराणने त्यांचा अणुकार्यक्रम गुंडाळल्याच्या बदल्यात संबंधित अटी व शर्तीच्या पूर्ततेसाठी अमेरिकेने हे जडपाणी विकत घेण्याचे ठरवले आहे. अमेरिका स्वत: जडपाणी तयार करीत नाही व आतापर्यंत ते कॅनडा व भारताकडून विकत घेतले जात होते. विकत घेतलेले जडपाणी अमेरिकेत देशांतर्गत संशोधन संस्थांना फेरविक्री केले जाते. अमेरिकी सरकारने ऊर्जा खात्याच्या माध्यमातून ३२ मेट्रिक टन जडपाणी खरेदी करण्याचे ठरवले असून, त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यास मदत होईल असे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या एलिझाबेथ थ्रुडू यांनी सांगितले. गेल्या वर्षी इराणबरोबर अमेरिका व इतर पाच देशांचा अणुकरार झाला असून, त्यात इराणने जडपाण्याचा साठा कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. जडपाणी हे किरणोत्सारी नसल्याने त्याबाबत सुरक्षेच्या फार चिंता नसतात व अमेरिकी उद्योग त्याचा वापर करू शकतात. अमेरिका जडपाण्याचा वापर शांततामय अणुसंशोधनासाठी करेल, हे जडपाणी पुढील आठवडय़ात अमेरिकेला मिळणार असून, ते ओक रीज नॅशनल लॅबोरेटरी येथे ठेवले जाणार असून, नंतर त्याची फेरविक्री केली जाणार आहे. अणुकरारातील शर्तीनुसार इराणने त्यांचा जडपाण्याचा साठा १३० मेट्रिक टन इतका खाली आणणे गरजेचे आहे.