व्यावसायिक स्पर्धेत अग्रेसर राहता यावे यासाठी चिनी कंपन्यांना सहकार्य करणाऱ्या आणि त्यासाठी अमेरिकेतील खासगी कंपन्यांची संकेतस्थळे ‘हॅक’ करणाऱ्या चिनी लष्करातील पाच सैनिकांना अमेरिकेच्या न्याय विभागाने दोषी ठरविले.
  आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘सायबर हेरगिरीचे’ हे पहिलेच प्रकरण असल्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. चीनने मात्र हा निवाडा फेटाळला असून याचे अमेरिका-चीन संबंधांवर विपरीत परिणाम होतील, असे म्हटले आहे.
चिनी अधिकाऱ्यांवरील आरोप
सायबर हेरगिरी करण्याचे काम करणारा चीन हा एकमेव देश नाही, अमेरिकाही अशी हेरगिरी करते. पण हेरगिरी करणे म्हणजे एखाद्या देशातील खासगी कंपन्यांची माहिती चोरून ती आपल्या देशाच्या मालकीच्या कंपन्यांना देणे नव्हे, अशा शब्दांत अमेरिकेवर चीनने टीका केली. संपूर्ण चौकशीअंती ‘पीपल्स लिबरेशन आर्मी ऑफ चायना’च्या सैनिकांनी ही उठाठेव केवळ चीनच्या सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या लाभासाठी आणि त्यांना अमेरिकेत व्यापारविस्तार करता यावा म्हणून केल्याचे आमचे मत आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
पीएलए युनिट ६१३९८
चिनी सैन्यातील हॅकिंगचा आरोप असलेले दल. या दलाने तब्बल २० खासगी कंपन्यांचे १४१ संगणक हॅक केल्याचा आरोप आहे. ज्याद्वारे शेकडो टेराबाईट (१ टेराबाईट म्हणजे – १००० जीबी) माहिती चोरली गेल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. या दलात इंग्रजीवर प्रभुत्व असलेले हजारो तरुण असावेत, असे मँडियंटने आपल्या अहवालात म्हटले आहे.
१९ फेब्रुवारी, २०१३ रोजी याविषयी पहिल्यांदा माहिती उघड झाली होती. या दलातील वँग डाँग, स्युन किलियांग, वेन झिन्यु, हुआँग झिन्यु, ग्यु चुनहुई या पाच अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
व्हाईट हाऊसचा इशारा
शासन पुरस्कृत सायबर हेरगिरी कदापि सहन करणार नाही. सायबर हेरगिरी करण्याबाबत आक्षेप नसले, तरीही खासगी कंपन्यांची ‘व्यापारी गुपिते’ शासन पुरस्कृत हेरगिरीद्वारे चोरली जाणार असतील, तर असल्या उचापती अमेरिका कदापि सहन करणार नाही, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.
चीनने आरोप फेटाळले
आपण स्वत: चोरी करायची आणि इतरांवर हेरगिरीचे आक्षेप घ्यायचे, हा अमेरिकी दुटप्पीपणा मान्य नाही. अमेरिकेने केलेले आरोप प्रबळ पुराव्यांद्वारे सिद्ध केलेले नाहीत. त्यामुळेच चीन हे आरोप फेटाळून लावत आहे. चीन हाच अशा हेरगिरीचा बळी ठरला आहे. त्यामुळे यापुढे अमेरिकेला सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य करणे थांबविणार आहोत, असे चीनने स्पष्ट केले आहे.

नेमके काय घडले?
अमेरिकेतील सौरऊर्जा उपकरणे तयार करणारी ‘सोलार वर्ल्ड’ कंपनी, आण्विक ऊर्जा निर्मिती प्रकल्प बांधणी करणारी वेस्टिंग हाऊस आणि धातू उद्योगातील कंपन्या अशा अनेक कंपन्यांची गोपनीय कागदपत्रे, काही प्रकल्पांची आरेखने आणि काही कंपन्यांची मूल्य निर्धारण धोरणे २००६ ते २०१४ या कालावधीत सातत्याने हॅक होत होती. आणि ‘योगायोगा’ने त्या कंपन्यांच्या हातातील कंत्राटे ‘चिनी’ कंपन्यांच्या हाती पडत होती. यामध्ये अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. मात्र अमेरिकेतील मँडियंट या सायबर सुरक्षा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने हे हॅकिंग ‘पीपल्स लिबरेशन आर्मी ऑफ चायना’च्या शांघाय येथील कार्यालयात असलेल्या संगणकांवरून होत असल्याचे शोधून काढले. आणि याप्रकरणी ‘उचापतखोर’ चिनी अधिकाऱ्यांना ‘प्रकाशात’ आणले.

चीन व रशिया परस्परांमधील संबंध दृढ करणार
अमेरिकेसमवेत असलेले संबंध गुंतागुंतीचे झाल्याच्या पाश्र्वभूमीवर परस्परांच्या हिताच्या मुद्दय़ावर एकत्र येऊन संबंध बळकट करण्यावर चीन व रशियाने भर दिला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मंगळवारी येथे आगमन झाले. चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी गेल्या वर्षी आपला पदभार स्वीकारल्यानंतर पुतिन हे प्रथमच चीनच्या दौऱ्यावर आले आहेत. युक्रेनची समस्या, सामुद्रिक हद्दीचा वाद आदी मुद्यांवरून अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांनी सध्या रशियावर टीकास्त्र सोडले आहे. चीन आणि रशिया यांच्यातील प्रांतिक वादावरून आंतरराष्ट्रीय समुदायाने टीका केल्याच्या पाश्र्वभूमीवर उभय नेत्यांनी चर्चा करून परस्परांमधील संबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला. जिनपिंग आणि पुतिन यांच्यातील चर्चा संपल्यानंतर उभयतांनी संयुक्त निवेदन जारी करून युक्रेनमधील राजकीय पेचप्रसंगाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. संबंधित पक्षांनी संयम बाळगून संघर्ष टाळावा आणि सध्याच्या समस्यांवर राजकीय आणि शांततापूर्ण तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.