भारतात करोना विषाणूची दुसरी लाट चालू असून नागरिकांनी त्या देशात जाऊ नये, असे आवाहन अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना केले आहे. सेंटर फॉर डिसीज अँड कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैज्ञानिक माहितीवर आधारित प्रवास सूचना अमेरिकेत वेळोवेळी जारी करण्यात येत असतात. त्यानुसार सध्या भारतात करोनाची दुसरी लाट सुरू असून तेथे लोकांनी प्रवास करू नये, असे म्हटले आहे.

सीडीसीने कोविड १९ साथीबाबत भारतात प्रवेश करू नये यासाठी चार क्रमांकाचा इशारा जारी केला असून भारतात करोना विषाणूची लाट गंभीर असल्याचे म्हटले आहे. सोमवारी सीडीसीने म्हटले आहे की, कोविड १९ साथरोग हा मानवतेला मोठा धोका असून त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, त्यामुळे कुणीही भारतात प्रवास करू नये.  लस घेतली असलेल्या लोकांनाही भारतात  जाऊ नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. भारतात प्रवास करणे अगदीच अनिवार्य असेल तर लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे.

लशीचा कच्चा माल पुरवण्याबाबत मौन

भारताच्या करोना  लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंवा औषधी घटकांच्या गरजा आम्ही समजू शकतो. त्यावर विचार केला जाईल, त्याबाबत आताच ठोसपणे काही सांगता येणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांना टॅग करून लिहिलेल्या एका ट्विट संदेशात म्हटले होते की, अमेरिकेने कोविड प्रतिबंधक लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा भारताला करावा, त्यामुळे पुरेशी लस निर्मिती शक्य होईल. त्यावर कुठलेही ठोस आश्वासन न देता अमेरिकेने यावर विचार केला जाईल, असे म्हटले आहे.