अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले

पाकिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय मिळत असल्याबद्दल अमेरिकेने गुरुवारी पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. अफगाणिस्तानात अस्थिरता माजविणाऱ्या, तेथील अमेरिकेच्या सैनिकांना धोका पोहोचविणाऱ्या आणि भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांना देशात थारा देण्याबाबतच्या भूमिकेत पाकिस्तानने ऐतिहासिक बदल करावा, असे अमेरिकेने म्हटले आहे.

अफगाणिस्तानात अस्थिरता पसरविणाऱ्या, तेथील अमेरिकेच्या सैनिकांना धोका पोहोचविणाऱ्या आणि भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांना देशांत सुरक्षित आश्रय देण्याबाबतच्या भूमिकेत पाकिस्तानने बदल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर यांनी म्हटले आहे.

आम्ही सर्वजण पाकिस्तानला जे सांगत आहोत त्यामागील भूमिका त्यांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे, दहशतवादाचा पाकिस्तानलाही धोका आहे असे पाकिस्तानच्या नेत्यांनाही आम्ही सांगितले आहे, असे कार्टर यांनी त्यांच्यासमवेत जपानहून दिल्लीस येणाऱ्या वार्ताहरांना सांगितले. पाकिस्तानने आपल्या भूमिकेत ऐतिहासिक बदल करणे गरजेचे असून ते तशा प्रकारचा बदल करतील, असेही ते म्हणाले.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही संरक्षण मंत्रालयाच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका घेतली आहे. हक्कानी नेटवर्कसारख्या जहाल अफगाण तालिबानी गटांना पाकिस्तानमध्ये आश्रय मिळत असल्याबद्दल आम्ही पाकिस्तानातील नेत्यांकडे चिंता व्यक्त केली आहे. अफगाण तालिबानी गटांना पाकिस्तान सातत्याने सहन करीत असून दहशतवादी कारवायांसाठी ते पाकिस्तानच्या भूमीचा वापर करीत आहेत त्याबद्दलही आम्ही पाकिस्तानच्या उच्चपदस्थ नेत्यांकडे चिंता व्यक्त केली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता मार्क टोनर यांनी वार्ताहरांना सांगितले.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी दहशतवाद प्रतिबंधक कारवाईत एकमेकांना सहकार्य करावे, त्यामुळेच प्रादेशिक स्थैर्य निर्माण होईल, असे आम्ही दोन्ही देशांच्या नेत्यांना सातत्याने प्रोत्साहन देत आहोत, असे टोनर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

अलीकडेच भारतात पार पडलेल्या हार्ट ऑफ आशिया परिषदेत भारत आणि अफगाणिस्तान यांनी, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला एकाकी पाडले होते आणि दहशतवादी आणि त्यांचे म्होरके यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले होते. त्या पाश्र्वभूमीवर टोनर यांनी वरील बाब स्पष्ट केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत पाकिस्तानचा नामोल्लेख न करताच जोरदार टीका केली होती. तर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी, तालिबानसह अन्य दहशतवादी गटांना छुपा पाठिंबा देऊन पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध अघोषित युद्ध पुकारल्याचा आरोप केला.