अमेरिकेतील ‘नोवावॅक्स’ या कंपनीने करोनावर तयार केलेल्या लशीच्या चाचण्या ऑस्ट्रेलियात सुरू करण्यात आल्या असून एकूण १३१ स्वयंसवेकांना ही लस टोचून त्याची परिणामकारकता तपासली जाणार आहे असे कंपनीचे प्रमुख डॉ. ग्रेगरी ग्लेन यांनी सांगितले. मंगळवारी मेलबर्नमध्ये सहा जणांना लस टोचण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या न्युक्लीयस नेटवर्कचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ  पॉल ग्रिफीन यांनी दिली आहे.

अमेरिका, चीन व युरोप हेच लस तयार करण्याच्या प्रयत्नात आघाडीवर असून अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने तसेच ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठानेही लस तयार केली आहे. पण त्यांच्या चाचण्या होऊन प्रत्यक्ष वापरात येण्यास अजून किमान बारा महिने लागू शकतात. नोव्हाव्ॉक्स कंपनीची लस प्राण्यांमध्ये सुरक्षित ठरली असून या लशीचे १० कोटी डोस २०२१ पर्यंत तयार करण्यात येणार आहेत त्यासाठी १.५ अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. या लशीचे नाव एनव्हीएक्स सीओव्ही २३७३ असून नार्वेतील कोअ‍ॅलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेर्डनेस इनोव्हेशन्स या संस्थेने त्यात ३८८ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

मेलबर्न व ब्रिस्बेन येथे जुलैत या लशीच्या पहिल्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात अनेक देशांचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.  ही लस रिकॉम्बिनंट प्रकारची असून त्यात जनुकीय अभियांत्रिकीचा वाप करून करोना विषाणूतील घातक प्रथिनाच्या आवृत्त्या तयार करण्यात आल्या आहेत. त्या कीटकात तयार करून नंतर त्यांचे शुद्धीकरण करून नॅनो कणांच्या रूपात लस तयार केली आहे.

विविध देशांच्या लशींचा प्रवास

अमेरिकेची मॉडर्ना इन्कार्पोरेशन व चीनची कॅनसिने बायोलॉजिक्स या कंपन्यांनी लस निर्मितीत आघाडी घेतली असून  त्यांचे निष्कर्ष चांगले आले आहेत. भारताने लस निर्मितीत फारशी प्रगती केली नसली तरी तो मोठी भूमिका पार पाडू शकतो असे फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनाइन यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या एकूण दहा लशींवर प्रयोग चालू असून विषाणूतील घातक प्रथिनाला त्यात लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार सहा महिन्यात भारतीय लशीच्या चाचण्या सुरू करण्यात येतील. भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. व भारतीय वैद्यक संशोधन परिषद संयुक्तपणे लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. निष्क्रिय विषाणूच्या माध्यामातून ही लस तयार केली जात आहे. झायडस कॅडिला ही कंपनी दोन लशी तयार करीत आहे तर सिरम इन्स्टिटय़ूट, बायॉलॉजिकल इ., भारत बायोटेक, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स,मिनव्ॉक्स हे प्रत्येकी एक लस तयार करीत आहेत. अमेरिकेत ऑपरेशन वार्प स्पीड या प्रकल्पात १४ लशींच्या चाचण्या १ लाख जणांवर करण्यात येणार आहेत. दहा वर्षांचा हा कार्यक्रम आहे. मॉडर्ना, ऑक्सफर्ड विद्यापीठ, अ‍ॅस्ट्राझेनेका, जॉन्सन अँड जॉन्सन, सॅनोफी, मर्क यांच्या लशींच्या चाचण्या करण्यासाठी एक ते दीड लाख लोकांनी नोंदणी केली आहे. थायलंडने एमआरएनए लस तयार करण्याचे ठरवले असून ती आग्नेय आशियात उपलब्ध केली जाणार आहे. गेल्या आठवडय़ात माकडांवर व नंतर उंदरांवर या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. जपानच्या व्हेन्चर अ‍ॅनगेस कंपनीने जुलैत डीएनए लशीच्या चाचण्या सुरू करण्याचे ठरवले आहे.