अमेरिकेत खर्च विधेयक सिनेटने फेटाळल्यानंतर शट डाऊनची (टाळेबंदीसदृश स्थिती)  नामुष्की आल्यानंतर आता हा पेच मिटवण्यासाठी अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधींनी प्रयत्न सुरू केले आहेत. शटडाऊनचे परिणाम शुक्रवारी रात्रीपासून सुरू झाले असून न्यूयॉर्क येथील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे ठिकाण पर्यटकांसाठी बंद झाले आहे. आता सोमवारपासून त्याचे आणखी गंभीर परिणाम जाणवणार आहेत.

रिपब्लिकन व डेमोक्रॅटस यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. २० जानेवारीपर्यंतच्या खर्चासाठी विधेयक मंजूर करणे अपेक्षित होते पण ते होऊ शकले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच नेमकी ही नामुष्की आली आहे. या प्रश्नावर राजकीय ध्रुवीकरण झाले असून अमेरिकेतील प्रमुख शहरात शेकडो लोकांनी ट्रम्प यांच्या विरोधात मोर्चे काढले आहेत. सिनेटमधील रिपब्लिकन नेते मिश मॅकॉनेल यांनी सांगितले की, रविवारी पुन्हा या खर्चाच्या विधेयकासाठी मतदान होणार आहे. दोन्ही सभागृहांचे अधिवेशन त्यासाठी बोलावण्यात आले आहे. स्थलांतराच्या मुद्दय़ावर रिपब्लिकन पक्षाची कोंडी करण्यासाठी डेमोक्रॅटसनी आर्थिक कोंडी केली असून डेमोक्रॅटसनी रिपब्लिकनांवर सात लाख स्वप्नाळू स्थलांतरितांसाठीच्या योजनेला पाठिंबा न देऊन विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, डेमोक्रॅटसना बेकायदेशीर स्थलांतरितांची फारच चिंता लागली असून ते आपल्या लष्करापेक्षा व दक्षिणेकडील सीमेवरच्या सुरक्षेपेक्षा मोठे वाटत आहेत. आवश्यक संघराज्य सेवा व लष्करी सेवा या चालू असून त्यांना वेतन मिळणार नाही. १९९० मध्ये पहिले शट डाऊन झाले होते तर शेवटचे २०१३ मध्ये झाले होते. त्यावेळी आठ लाख कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या रजेवर पाठवण्यात आले होते. शुक्रवारी या पेचावर तोडगा निघणे अपेक्षित होते.