News Flash

‘आऊटसोर्सिग’विषयक विधेयक अमेरिकी काँग्रेसमध्ये पुन्हा सादर

सेशन्स यांच्या राजीनाम्याची मागणी सूडापोटी- ट्रम्प

| March 4, 2017 12:27 am

कॉल सेंटरच्या नोकऱ्या अमेरिकेतून भारतासारख्या देशांत नेणाऱ्या कंपन्यांना सरकारी निधी व अन्य सवलती देण्यास मज्जाव करणारे आऊटसोर्सिगविषयी विधेयक अमेरिकी काँग्रेसमध्ये पुन्हा सादर झाले.

डेमोक्रॅटिक पक्षाचे जीन ग्रीन आणि रिपब्लिकन पक्षाचे डेव्हिड मॅककिनले या काँग्रेस सदस्यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. ‘यूएस कॉल सेंटर अ‍ॅण्ड कन्झ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट’ असे या विधेयकाचे नाव असून आऊटसोर्सिगच्या माध्यमातून अमेरिकेतील नोकऱ्या देशाबाहेर नेणाऱ्या कंपन्यांची जाहीर यादी तयार करून त्यांच्या सवलती रद्द करण्याची शिफारस त्यात आहे.

गेल्या काही वर्षांत अनेक अमेरिकी व अन्य कंपन्यांनी भारत, फिलिपिन्स व अन्य देशांत कॉल सेंटर स्थापित करून अनेक सेवांचे आऊटसोर्सिग केले आहे. त्यामुळे अमेरिकेतील स्थानिकांच्या नोकऱ्या या देशांतील नागरिकांना मिळत असल्याची ओरड होऊ लागली आहे. त्या अनुषंगाने २०१३ साली अशा स्वरूपाचे विधेयक आणले गेले होते. आता ते नव्याने सादर केले आहे.

ग्रीन यांच्या म्हणण्यानुसार केवळ ह्य़ूस्टनच्या आसपासच्या परिसरात कॉल सेंटरच्या ५४,००० नोकऱ्या असू शकतात. तर संपूर्ण अमेरिकेत असा २५ लाख नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. मात्र साधारण प्रशिक्षित मनुष्यबळ स्वस्तात मिळत असल्याने या अनेक नोकऱ्या भारत व अन्यत्र गेल्या आहेत. त्यावर आता कायदेशीर नियंत्रण आणण्याचा अमेरिकेत विचार सुरू आहे.

सेशन्स यांच्या राजीनाम्याची मागणी सूडापोटी- ट्रम्प

वॉशिंग्टन : रशियाशी असलेल्या वादग्रस्त संबंधांच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकी महाधिवक्ता जेफ सेशन्स यांच्या राजीनाम्याची मागणी करून डेमोक्रॅटिक पक्षाने एक प्रकारे सूडाची कृती केली आहे, अशी टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. रशियासंबंधी तपासात भाग घेण्यास सेशन्स यांनी असमर्थता व्यक्त केली होती.

सेशन्स यांनी काल असे जाहीर केले होते, की अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारादरम्यानच्या गैरप्रकारांच्या चौकशीतून आपण माघार घेत आहोत. रशियाशी अमेरिकेचे त्या काळात जे संबंध होते त्याचा आधार घेत डेमोक्रॅटिक पक्षाने सेशन्स यांच्यावर टीका केली. रशियन राजदूतांबरोबर सेशन्स यांच्या काही बैठका झाल्या, पण त्यात मी काही औचित्यभंग केलेला नाही व सिनेटच्या निवड सुनावणीत खोटेही बोललो नाही असे सेशन्स यांचे म्हणणे आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सेशन्स यांच्यावर विश्वास दाखवला असून, रशियाचे राजदूत सर्जे किसल्याक व सेशन्स यांच्यातील संबंधांची आपल्याला कल्पना नव्हती. सेशन्स हे प्रामाणिक आहेत व डेमोक्रॅटिक पक्ष वास्तवतेपासून भरकटत सूड उगवत आहे असा आरोप त्यांनी केला.

आरोग्य खात्याच्या प्रमुखपदाच्या शर्यतीत सीमा वर्मा

वॉशिंग्टन : अमेरिकी आरोग्य सेवा खात्याच्या (सेंटर फॉर मेडिकेअर अँड मेडिकेड सव्‍‌र्हिसेस) प्रमुखपदाच्या शर्यतीत अमेरिकी-भारतीय वंशाच्या सीमा वर्मा यांनी बरीच पुढे मजल मारली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे नामांकन केले असून वर्मा यांनी निवडीच्या सुरुवातीच्या टप्प्यांत यश संपादन करून आगेकूच केली आहे. आरोग्य सेवासंबंधी सल्लागार असलेल्या वर्मा यांनी अर्थविषयक समितीत १३ विरुद्ध १२ अशा मत फरकाने सदस्यांची सहमती मिळवली. आता सिनेटमध्ये त्यांच्या उमेदवारीवर मतदान होईल आणि त्यांनतर त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाईल. सिनेटमधील मतदानाची तारीख अद्याप निश्चित नाही. सेंटर फॉर मेडिकेअर अँड मेडिकेड सव्‍‌र्हिसेसमधून १३० दशलक्ष अमेरिकी नागरिकांना आरोग्य सेवा पुरवल्या जातात. त्यात माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी सुरू केलेल्या ‘ओबामाकेअर’ या योजनेचाही समावेश आहे. नवे अध्यक्ष ट्रम्प यांनी त्या कायद्याऐवजी दुसरा कायदा आणण्याची तयारी चालवली आहे. निवडून आल्यास अशा बदलत्या परिस्थितीत आरोग्य सेवा खात्याची जबाबदारी वर्मा यांच्यावर असेल. या खात्यात ६५०० कर्मचारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 12:27 am

Web Title: us congress democratic party donald trump
Next Stories
1 बचत खात्यात किमान रक्कम न ठेवल्यास एसबीआय दंड आकारणार
2 केरळच्या मुख्यमंत्र्यांबद्दल चिथावणीखोर भाष्य करणारा संघाचा ‘तो’ नेता निलंबित
3 राष्ट्रगीतावेळी उभा राहिलो म्हणून मी संघाचा झालो का?: अर्णब गोस्वामी
Just Now!
X