अमेरिका व इस्रायलच्या दक्षिण भारतातील दूतावासात हल्ले करण्याचा कट आखल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या नागरिकाबाबत आपण मलेशियन अधिकाऱ्यांकडून भारत लवकरच अधिक माहिती घेणार आहे.
मलेशियानेच भारताच्या केंद्रीय सुरक्षा संस्थांना चेन्नई व बंगळुरू येथे अमेरिका व इस्रायलच्या दूतावासांवर हल्ला करण्याचा अतिरेक्यांचा कट असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता गेल्या बुधवारी क्वालालंपूर येथे एका श्रीलंकन नागरिकाला अटक करण्यात आली होती. मलेशियाच्या खास पथकाने त्याला अटक केली असून त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या डिसेंबरपासून तो भारतात हल्ले घडवण्याच्या कटात सामील होता असे पोलीस उप महानिरीक्षक बाक्री झिनिन यांनी त्याच्या अटकेनंतर सांगितले.
 पैशांची साठेबाजी व मानवी तस्करींच्या प्रकरणांची चौकशी करीत असताना मलेशियाच्या अधिकाऱ्यांना काही धागेदोरे हाती आले होते त्यानंतर साकीर हुसेन हा श्रीलंकेचा नागरिक आयएसआयच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले व ते सर्व या दोन दूतावासांवर हल्ल्याचा कट आखत होते. मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी हुसेन याला अटक केल्यानंतर त्याबाबतची माहिती क्वालालंपूर व कोलंबो येथील संस्थांना दिली. आता तामिळनाडू पोलीस राजनैतिक मार्गाने मलेशियाच्या अधिकाऱ्यांकडून श्रीलंकेच्या अटक केलेल्या नागरिकाने दिलेल्या जाबजबाबांचा अहवाल मागवण्याच्या विचारात आहेत. हुसेन याने असे सांगितले की, श्रीलंकेतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयासाठी आपण भाडोत्री म्हणून काम करीत होतो व चेन्नईतील अमेरिकी दूतावास व बंगळुरूतील इस्रायली दूतावासाची टेहळणी केली होती.