झाकी उर रेहमान लख्वी याची पाकिस्तानने सुटका केल्याबाबत अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
नेहमीच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जेफ रॅथके यांनी सांगितले, की मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झाकी उर रेहमान लख्वी याला जामिनावर सोडण्यात आले ही गंभीर बाब आहे.
दहशतवादी हल्ल्यात अनेक देशांची सामूहिक जबाबदारी असेल. पाकिस्तानने गुन्हेगारांना, त्यांच्या अर्थपुरवठादारांना व पुरस्कर्त्यांना शिक्षा करण्याचे आश्वासन दिले होते. मुंबईतील हल्ल्यात १६६ जण मरण पावले होते व त्यात सहा अमेरिकी व्यक्तींचा समावेश होता.
लख्वीच्या सुटकेचे काय परिणाम होतील याबाबत काही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. लख्वीला सोडल्याच्या घटनेबाबत आम्हाला चिंता वाटते, असे मात्र सांगितले. मुंबई हल्ल्यातील गुन्हेगारांना एका विशिष्ट काळात शिक्षा करणे आवश्यक होते, त्यामुळे आम्ही त्या दिशेने प्रयत्न करीत राहू, असे त्यांनी सांगितले. मुंबई खटल्याची सुनावणी २००९ मध्ये पाकिस्तानात सुरू झाली. लख्वी हा जमात उद दवाचा प्रमुख हाफिझ सईद याचा नातेवाईक आहे.