करोना व्हायरस या महामारीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. चीनच्या वुहान शहरातून उद्भवलेल्या या महामारीनं जगाभरातील २२ लाखांपेक्षा जास्त लोकांना ग्रासलं आहे. करोना व्हायरसमुळे जगभरात तब्बल दीड लाख लोकंना आपला जीव गमावावा लागला आहे. करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच असून करोनाबाधितांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. अमेरिकेत करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ३६ हजार असून जगात सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशात अमेरिका सर्वात पुढे आहे. करोनाग्रस्त आणि करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे.

Baltimore-based university च्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत अमेरिकेत करोना व्हायरसमुळे ३६७७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७००२८२ जण करोनाबाधित आहेत. शुक्रवारी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेतील न्यूयार्क शहरात झाले आहेत. आतापर्यत न्यूयार्कमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजारांच्या पुढे गेली आहे. एखाद्या देशांपेक्षा जास्त मृत्यू न्यूयार्कमध्ये झाले आहे. मागील २४ तासांत अमेरिकेत तीन हजार ८५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा : अचानक चीनमधील मृतांचा आकडा ५० टक्क्यांनी वाढला

करोना व्हायरसवर मात केल्याचा बोबाटा करणाऱ्या चीनमध्ये मागील २४ तासांत ५० टक्केंनी मृत्यू वाढले आहेत. मागील २४ तासांत चीनमध्ये १२९० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चीनच्या करोना व्हायरसच्या रिपोर्टवर ताशेरे ओढले आहेत. चीन मृत्यूचा आकडा लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमेरिकेपेक्षा जास्त मृत्यू चीनमध्ये झाले असतील असा दावाही त्यांनी केला आहे.