तीन नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पेनसिल्वेनियातील निकालाबाबत अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अपील याचिका फेटाळण्यात आल्याने त्यांच्या प्रचार चमूला धक्का बसला आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, देशाचा अध्यक्ष वकील नव्हे मतदार निवडत असतात. पेनसिल्वेनियात डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन हे विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर चार दिवसांनंतर ट्रम्प यांच्या दाव्यावरचा निकाल देण्यात आला असून पेनसिल्वेनियात एकूण २० प्रतिनिधी मते आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, प्रतिनिधिगृहाने बायडेन यांच्या बाजूने कौल दिला तर आपण व्हाइट हाऊस सोडण्यास तयार आहोत. पण पराभव मान्य करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. अध्यक्षीय निवडणुकीतील निकालाबाबत त्यांनी अनेक राज्यात खटले दाखल केले असून त्यासाठी त्यांनी कुठलेही विश्वासार्ह पुरावे दिलेले नाहीत. मतदान व मतमोजणीत घोटाळे झाले असल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यांचे अनेक दावे न्यायालयांनी फेटाळून लावले आहेत.

अमेरिकेच्या अपील न्यायालयाने शुक्रवारी ट्रम्प यांच्या प्रचारक गटांचा पेनसिल्वेनियातील निकालाबाबात आधी देण्यात आलेल्या निकालावर दाखल करण्यात आलेला अपिलाचा अर्ज फेटाळून लावला. न्यायाधीश स्टेफॅनोस बिबास यांनी सांगितले की, ठोस आरोप व त्याला पुष्टी देणारे पुरावे यात आवश्यक असतात. तत्कालीन रिपब्लिकन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी नेमलेले न्यायाधीश ब्रुक्स स्मिथ व न्या. मायकेल चॅगेअर्स यांचाही या न्यायपीठात समावेश होता.