News Flash

भारतीयांच्या संशयास्पद बँक व्यवहारांवर अमेरिकेत अंकुश

‘इंडियन एक्स्प्रेस’कडून आणखी एक प्रकरण उघड

‘इंडियन एक्स्प्रेस’कडून आणखी एक प्रकरण उघड

रितू सरीन, श्यामलाल यादव, जय मझुमदार, संदीप सिंह, खुशबू नारायण : एक्स्प्रेस वृत्तसेवा 

नवी दिल्ली, मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराचे २०१३मधील ‘ऑफशोर लिक्स’ प्रकरण, २०१५मधील ‘स्वीस लिक्स’ प्रकरण, २०१६मधील ‘पनामा पेपर्स’ प्रकरण आणि २०१७मधील ‘पॅराडाईज पेपस’ प्रकरण यांपाठोपाठ आता ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने भारतीयांचा समावेश असलेले आणखी एक आंतरराष्ट्रीय संशयास्पद आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उजेडात आणले आहे. ‘फिनकेन फाईल्स’ असे त्याचे नाव आहे.

हे ताजे प्रकरण उघडकीस आणताना त्यातील भारतीयांचा समावेश शोधण्यासाठी दोन हजारांहून अधिक गुप्त कागदपत्रांच्या साठय़ांची तपासणी दि इंडियन एक्स्प्रेसने केली. मनी लाँड्रिंग, दहशतवाद, अंमली पदार्थाचा व्यापार किंवा आर्थिक फसवणूक केल्याचा संशय असल्याने भारतीयांच्या या संशयास्पद बँक व्यवहारांना अमेरिकी अर्थखात्याचा ‘वॉचडॉग’ असलेल्या ‘आर्थिक गुन्हे सक्तवसुली संस्थेने’ (फिनकेन) अंकुश लावला आहे. ‘फिनकेन’ने  या कागदपत्रांना ‘सस्पीशियस अ‍ॅक्टिव्हिटी रिपोटर्स’ (सार्स) असे संबोधले आहे.

अशा प्रकारच्या संशयास्पद कागदपत्रांची तपासणी ‘फिनकेन’द्वारे करण्यात येते. संबंधित बँकांच्या अनुपालन अधिकाऱ्यांमार्फत आर्थिक गुन्ह्यांचा ठपका असलेल्या व्यवहारांची किंवा त्यात सामील ग्राहकांची माहिती संकलित करण्यात येते. संबंधित बँकांनीच अशा व्यवहारांबद्दल शंका घेऊन या प्रकरणांची कायदेशीर चौकशी करण्याचे सुचवले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानेही या प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे.

‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने तीन महिन्यांत सर्व ‘सार्स’ अहवालांची तपासणी केली आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे भारतात आधीपासून छाननी सुरू असलेल्या भारतीय व्यक्तींच्या शोध घेतला. त्यातून एक महत्त्वाचा शोध लागला, तो म्हणजे ‘सार्स’ अहवालात उल्लेख असलेल्या अनेक भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांची भारतातील तपाससंस्था चौकशी करीत आहेत. टू जी सारख्या गैरव्यवहार, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा; रोल्स रॉयस लाचखोरी प्रकरण आणि एअरसेल-मॅक्सिस प्रकरण, त्याचबरोबर अन्य भ्रष्टाचार प्रकरणांत गुंतलेल्या अनेक भारतीय व्यक्तींचा समावेश ‘फिनकेन’ने ठपका ठेवलेल्यांमध्ये आहे. या प्रकरणांची चौकशी सीबीआय, सक्तवसुली संचालनालय यांच्या मार्फतही करण्यात येत आहे.

जगभरातील १०९ माध्यम संस्थाचा तपासणीत सहभाग

दी इंडियन एक्सप्रेसने, ल् माँद (फ्रान्स), असाही शिम्बुन (जपान), सुडय़ूउत्शे झेतुंग (जर्मनी), आफ्टनपोस्टेन (नॉर्वे), एनबीसी (अमेरिका), बीबीसी आणि ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसह ८८ देशांमधील १०९ माध्यम संस्था आणि ‘इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टस् (आयसीआयजे), ‘बझफिड न्यूज’  यांच्यासमवेत १९९९ आणि २०१७ दरम्यान ‘फिनकेन’कडे दाखल झालेल्या ‘सार्स’ अहवालातील नामांकित भारतीय व्यक्ती आणि संबंधित बँकांचा शोध घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 3:04 am

Web Title: us curbs suspicious indian banking transactions zws 70
Next Stories
1 Coronavirus : ‘४ पीबीए’ गुणकारी?
2 करोनाचे अचूक निदान पाचशे रुपयांत!
3 लडाख सीमेवरील सहा प्रमुख शिखरांवर भारताचा ताबा
Just Now!
X