वडिल आपल्याकडे असलेली गन अर्थात बंदुक स्वच्छ करत होते. ती स्वच्छ करतानाच त्यांच्या हातून एक गोळी सुटली जी सहा वर्षांच्या मुलीला लागली आणि त्यातच ती मुलगी जखमी झाली त्यानंतर तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अमेरिकेतील इंडियाना भागात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. http://www.latestly.com ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. मकायला बोलिंग असे या मुलीचे नाव असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.

मकायलाचे वडिल त्यांच्याकडे असलेली हँड गन स्वच्छ करत बसले होते. ती गन अनलोडेड होती.. तरीही एक गोळी त्याच बंदुकीतून सुटली थेट मकायलाच्या डोक्यात शिरली. त्यानंतर मकायलाला तातडीने नॉर्टन रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे पोहचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

पोलिसांनी मकायलाच्या वडिलांचे नाव काय होते याची माहिती दिलेली नाही. या प्रकरणात चुकून हत्या झाली असे पोलिसांना वाटत नाही. गोळी नजरचुकीने सुटली होती असेही पोलिसांना वाटत नाही, त्यामुळे काही गुप्तचरांच्या मदतीने हा सगळा प्रकार कसा घडला याचा छडा लावण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहेत. मात्र या प्रकरणात या मुलीच्या वडिलांवर काय गुन्हा दाखल करण्यात आला आणि तो कोणत्या कलमांखाली आहे हे पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही.