पाकला एफ १६ विमाने विकल्याने संरक्षण समतोल ढळणार नसल्याचा दावा
अमेरिकेने पाकिस्तानला आठ एफ १६ जेट विमाने विकण्याचा निर्णय घेतला असला तरी भारताने काही काळजी करण्याचे कारण नाही, कारण त्यामुळे प्रादेशिक सुरक्षा समतोल बिघडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, असे अमेरिकेच्या संरक्षण खात्याने सांगितले. भारताने एफ १६ विमानांच्या अमेरिकेने पाकिस्तानला केलेल्या विक्रीबाबत अमेरिकी राजदूत रिचर्ड वर्मा यांना बोलावून नाराजी व्यक्त केली होती. भारताने चिंता व्यक्त केली असली तरी आमच्या मते त्याला फारसा अर्थ नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले.
पेंटॅगॉनचे सचिव पीटर कुक यांनी सांगितले की, पाकिस्तानला एफ १६ विमाने विकल्याने भारताने काळजी करण्याचे कारण नाही. ओबामा प्रशासनाने अमेरिकेला एफ १६ विमाने विकण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी ती पूर्वीच्याच आश्वासनाची पूर्तता आहे, असे अमेरिकेने याबाबत सांगितले होते.
पाकिस्तानला एफ १६ विमाने दिल्याने पाकिस्तानला दहशतवादविरोधी मोहिमेत मदत होणार आहे व त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रीय हित जपले जाणार आहे. ओबामा प्रशासनाने १३ फेब्रुवारीला असे म्हटले होते की, आम्ही पाकिस्तानला अण्वस्त्रवाहक क्षमता असलेली आठ एफ १६ विमाने विकणार आहोत. पाकिस्तानला ७० कोटी डॉलर्स किंमतीची ही विमाने दिली जाणार असून अमेरिकेत रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही सदस्यांनी त्याला विरोध करूनही ओबामा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला एफ १६ विमाने देताना प्रादेशिक सुरक्षा स्थितीचा विचार केला आहे.
पाकिस्तान व भारत यांच्याशी आमचे राजनैतिक संबंध चांगलेच आहेत पण पाकिस्तानची दहशतवाद विरोधी मोहिमा राबवण्याची क्षमता वाढावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे कुक यांनी सांगितले. एफ १६ ही जेट विमाने असून ती सर्व हवामानात, रात्रीच्यावेळीही मारा करू शकतात. त्यामुळे पाकिस्तानची संरक्षण क्षमता वाढणार आहे व त्यांचा उपयोग दहशतवाद विरोधी मोहिमांसाठी केला जाणार आहे, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे.